- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : ‘कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्हाला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. सुरुवातीचे दोन दिवस सगळेच घाबरलेले होते. कारण, अशा वेळी काय करावे याची कोणालाच कल्पना नव्हती. मात्र, रुग्णालयातील यंत्रणा तातडीने कार्यरत झाली. औषधोपचार सुरू झाल्यावर आता तब्येत पूर्ववत होत आहे. गेल्या पाच-सहा दिवसांमध्ये मला साधा खोकला, शिंकही आलेली नाही. दिवसभर आम्ही नामस्मरण, भजन करतो; आवडीची गाणी ऐकतो. आम्ही बरे होत आहोत...!’ हे बोल आहेत नायडू रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांचे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आणि घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी ‘लोकमत’शी दूरध्वनीवरून बोलताना केले.‘परदेशात प्रवास करून आल्यानंतर दोन-तीन दिवस ताप येत असल्याने मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी तपासणी करायला सांगितले आणि अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल केले. नातेवाइकांशी फोनवर बोलणे सुरू होते. मोबाइल जवळ असल्यामुळे बातम्याही कळत होत्या. कोरोना विषाणूचा संसर्ग झाला की, रुग्णांना खूप त्रास होतो, अशी माहिती अनेकांपर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचत आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाही. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांच्याकडून व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. दररोज रक्तदाब, टेंपरेचर तपासले जाते. सर्व जण ठरावीक अंतरावरून आमची तपासणी करत आहेत. आम्हाला मदतीसाठी काही संपर्क क्रमांक दिले आहेत. टेन्शन घ्यायचे नाही, पथ्य पाळायचे आणि सकारात्मक विचार करायचा, ही त्रिसूत्री या अडचणीतून बाहेरपडण्याचे बळ देत आहे’, अशा भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.काळजी घ्या, हाच सर्वोत्तम उपायते म्हणाले, ‘परदेशात गेल्यावर आम्ही अनेक ठिकाणी फिरलो, त्यामुळे संसर्ग नेमका कुठून झाला, हे सांगता येणार नाही. मात्र, सध्या प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, शासनाने दिलेले सर्व आदेश पाळावेत. विशेषत:, लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी, असे मला सांगावेसे वाटते. अशा काळात मोठ्या प्रमाणात अफवा पसरतात. त्यावरही आपण विश्वास ठेवू नये. स्वत:ची आणि आपल्या लोकांची काळजी घ्यावी, हाच सध्याचा सर्वोत्तम उपाय आहे. ’
Coronavirus : घाबरू नका, आम्ही ठणठणीत आहोत! कोरोनाग्रस्त रुग्णांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 5:16 AM