पुणे: कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या १ एप्रिलपासून होणाऱ्या विद्यापीठांच्या परीक्षेसाठी काही प्राध्यापकांची बहिस्थ वरिष्ठ पर्यवेक्षक पदी नियुक्ती केली. तसेच संबंधित प्राध्यापकांनी महाविद्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांचे काम करावे लागेल, असे आदेश विद्यापीठ प्रशासनातर्फे काढण्यात आले. त्यामुळे प्राध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विद्यापीठांना व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे येत्या 31 मार्च पर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, 31 मार्चपर्यंत सर्व सुरळीतपणे होईल,अशी शक्यता दिसून येत नाही. शासन आदेशानुसार सर्व विद्यार्थी व प्राध्यापक घरात बसूनच शैक्षणिक कामकाज करत आहेत. विद्यापीठातर्फे काही शैक्षणिक साहित्य ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यापीठ परिसरातील विविध विभागांमधील सुमारे 40 टक्के विद्यार्थी या शैक्षणिक साहित्याचा लाभ घेत आहेत. असे असले तरी येत्या १ एप्रिलपासून विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकमध्ये सुद्धा कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्राध्यापक घराबाहेर पडण्यास तयार नाहीत. त्यात विद्यापीठाने प्राध्यापकांची बहिस्थ वरिष्ठ पर्यवेक्षक पदी नियुक्त करून त्यांना परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील महाविद्यालयामधील एका प्राध्यापकाने ' लोकमत' शी बोलताना सांगितले, विद्यापीठाकडून बहिस्थ परिक्षक पदी नियुक्त झाल्याचे पत्र आम्हाला प्राप्त झाले आहे.मात्र धोरणामुळे निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर प्राध्यापकांची येत्या एक एप्रिलपासून परीक्षा केंद्रांवर जाण्याची मानसिकता नाही. तसेच एका परीक्षा केंद्रामध्ये 30 ते 40 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली जाते. परिणामी अनेक विद्यार्थी एकत्र येतील आणि कोरोनाचा संसर्ग वाढत जाईल. त्यामुळे विद्यापीठाने जोपर्यंत कोणामुळे निर्माण झालेली स्थिती सुधारत नाही.तोपर्यंत परीक्षांचे आयोजन करू नये.तसेच प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात परीक्षेसाठी बोलू नये.
1 एप्रिल पासून परीक्षा होतील किंवा नाही याबाबतचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर केला जाईल.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तयार केलेल्या ऑनलाइन प्रोग्राम मधून बहिस्थ वरिष्ठ परीक्षक पदी नियुक्त केलेल्या प्राध्यापकांना आपोआप परीक्षेच्या कामाचे संदेश पाठविले जातात. त्यानुसार प्राध्यापकांना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले होते. मात्र, ही प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात आली आहे. येत्या 31 मार्च पर्यंत च्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेऊन आणि शासनाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार येत्या 1 एप्रिल पासून परीक्षा होतील किंवा नाही याबाबतचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर केला जाईल.
- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ