CoronaVirus: ...म्हणून कोरोनावरील Fabiflub गोळ्यांवर तातडीने निर्बंध आणा: डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 07:33 AM2020-06-26T07:33:18+5:302020-06-26T07:56:42+5:30

काही दिवसांपूर्वी ग्लेनमार्क या औषध कंपनीनं पत्रकार परिषद घेत फॅबिफ्ल्यू औषध कोरोना रुग्णांना ठणठणीत करेल, असा दावा केला होता.

CoronaVirus: Fabiflu pills should be banned immediately, MP Dr. Amol Kolhe demand | CoronaVirus: ...म्हणून कोरोनावरील Fabiflub गोळ्यांवर तातडीने निर्बंध आणा: डॉ. अमोल कोल्हे

CoronaVirus: ...म्हणून कोरोनावरील Fabiflub गोळ्यांवर तातडीने निर्बंध आणा: डॉ. अमोल कोल्हे

googlenewsNext

पुणेः कोरोनावर निरनिराळी औषधं बाजारात येत असल्यानं गोंधळ वाढीस लागला आहे. आता राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या डॉ. अमोल कोल्हेंनीही अशाच एका औषधावर आक्षेप घेतला आहे. ग्लेनमार्क कंपनीच्या फॅबिफ्ल्यू या औषधाच्या एकूणच दर्जावर अमोल कोल्हेंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियातून अर्धवट माहिती पसरवून अनेकांची दिशाभूल केली जात आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. तसेच त्यांना या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करण्यासही सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी ग्लेनमार्क या औषध कंपनीनं पत्रकार परिषद घेत फॅबिफ्ल्यू औषध कोरोना रुग्णांना ठणठणीत करेल, असा दावा केला होता. विशेष म्हणजे कंपनीनं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचाही हवाला दिला होता. तसेच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानंही या औषधाच्या वापरास मान्यता दिल्याचं ग्लेनमार्कनं सांगितलं होतं. फॅबिफ्ल्यूच्या एका गोळीची किंमत १०३ रुपये असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यावर डॉ. अमोल कोल्हेंनी आक्षेप घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार रुग्णांना १४ दिवस या गोळ्या घ्याव्या लागतील. १४ दिवसांत रुग्णांनी १२२ गोळ्या खायच्या आहेत. त्या सर्व गोळ्यांचा एकूण खर्च १२ हजार ५०० रुपये होत आहे. एवढी किंमत सर्वसामान्यांना परवडणार आहे का?, असा सवालही अमोल कोल्हेंनी विचारला आहे.

गरीब अन् मध्यम वर्गीयांना कमी किमतीत कसा उपचार मिळेल, याकडे केंद्र सरकारनं लक्ष द्यायला हवं. महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णावर याची चाचणी घेण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. पण औषधाची किंमत ठरवताना गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांचा विचार केलेला दिसत नाही. अमोल कोल्हे यांनी आरोग्य मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हे औषध लोकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून द्यावं, अशी विनंती केली आहे.

तसेच फॅबिफ्ल्यू हे कोरोनावर  रामबाण औषध असल्याच्या दाव्याचंही कोल्हेंनी खंडन केलं आहे. सौम्य लक्षण असलेल्या ९० आणि मध्यम लक्षणे असलेल्या ६० रुग्णांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. पण त्यावेळी फक्त फॅबिफ्ल्यू ही गोळी नव्हे, तर इतर औषधांचाही वापर करण्यात आला आहे. ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेव्हल ९४ टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्यांना चाचणीतून वगळल्याची माहितीही सीटीआरआय संकेतस्थळावर दिलेली असल्याचा कोल्हेंनी पत्रात उल्लेख केला आहे. त्यामुळे ग्लेनमार्कच्या फॅबिफ्ल्यूच्या दाव्यावर तातडीनं पावलं उचलून त्यावर निर्बंध आणावेत, त्याप्रमाणेच डीसीजीआय आणि आयसीएमआरमार्फत चर्चा घडवून आणावी, अशी मागणी कोल्हेंनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. 
 

Web Title: CoronaVirus: Fabiflu pills should be banned immediately, MP Dr. Amol Kolhe demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.