पुणे : काेराेनाची लागण झाल्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील काेराेनाबाधिताच्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे. 52 वर्षीय रुग्णालाय डायबिटीस व हायपरटेंशन हाेते. याबाबतची माहिती पुण्याचे महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी दिली.
राज्यात काेराेनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला हाेता. दुबईवरुन आलेल्या दांपत्याला सर्वप्रथम काेराेनाच लागण झाल्याचे समाेर आले हाेते. नंतर हळूहळू पुण्यातील रुग्ण संख्येमध्ये वाढ हाेत गेली. मधल्या काळात पुणे शहर हे राज्यातील सर्वाधिक काेराेनाबाधित रुग्ण असणारे शहर हाेते. उपचारानंतर पुणे शहरातील अनेक रुग्णांची सुटका देखील करण्यात आली. आज पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू काेराेनामुळे झाला. या व्यक्तीला डायबिटीस व इतर विकार देखील हाेते. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचे अनेक अवयव निकामी झाल्याने त्याला मृत घाेषित करण्यात आले.
दरम्यान पुणे जिल्ह्यात सध्या 36 रुग्ण काेराेनाबाधित असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.