विमाननगर : येरवड्यातील एका महिलेच्या कोरोना आजाराच्या मृत्यूनंतर येरवड्यातील कोरोणाचा धोका वाढला असून या महिलेच्या संपर्कातील सोळा व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यामधील चार जणांना कोरोणाची लागण झाला असल्याचा अहवाल नायडू रुग्णालयाकडून प्राप्त झाल्याची माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
लक्ष्मीनगर येरवडा येथील ज्येष्ठ नागरिक महिलेचा शुक्रवारी रात्री ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता .मृत्यूनंतरच्या तपासणीत तिचा मृत्यू कोरोना आजारामुळे झाल्याचे स्पष्ट झाले . यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील परिसरातील सोळा लोकांची नायडू रुग्णालयात तपासणी करण्यात आली त्यातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल नायडू रुग्णालयाला सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला आहे .यापूर्वी येरवड्यातील आणखी एक रुग्ण पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यामुळे येरवड्यातील एकूण पाच रुग्ण कोरोना आजारासाठी सध्या उपचार घेत आहेत . दरम्यान कोरोना आजाराने मृत झालेल्या येरवड्यातील महिलेवर येरवडा विद्युतदाहिनी येथे सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
येरवड्यातील कोरोना रुग्णांची एकुण संख्या सध्या पाच झाली असून त्यामुळे येरवड्यातील या आजाराचा धोका वाढला आहे .येरवडय़ातील पहिला रुग्ण व मृत महिला हे दोन्ही लक्ष्मीनगर परिसरातील असून हा परिसर दाट लोकवस्तीचा परिसर आहे .महापालिकेकडून परिसरातील संशयित व संपर्कातील लोकांना नायडू रुग्णालयात तपासणी करण्यात आली असून त्यांना विलगीकरण तसेच पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत .परिसरातील संपर्कातील नागरिकांचे सर्वेक्षण तसेच निर्जंतुकीकरण व फवारणीचे काम देखील करण्यात आलेले आहे .मात्र अद्यापही येरवडा परिसरातील नागरिक गांभीर्याने वागत असताना दिसून येत नाहीत .किरकोळ सामान, भाजी विक्रीसाठी वारंवार परिसरात गर्दी होत आहे .एका महिलेच्या मृत्यूसह एकूण पाच रुग्ण वाढल्यामुळे येरवडा परिसरातील आजाराचा धोका वाढला आहे .त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत गर्दी करू नये असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे .