पुणे: कोरोनाविरुद्धच्या लढाईत वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिसही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या या कार्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केलं आहे. कोरोनाच्या लढाईत पोलीस थकले आहेत, पण हिंमत हरलेले नाहीत, असा शब्दांत देशमुख यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला उत्तम वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुणे श्रमिक पत्रकार संघाला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. कोरोनाच्या काळात गेल्या साडेपाच ते सहा महिन्यांपासून पोलीस कर्मचारी, अधिकारी दिवसरात्र रस्त्यावर उतरून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. या कालावधीत पोलीस दलातील २०८ सहकारी या आजारामुळे शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी गृह विभाग आवश्यक ते प्रयत्न करत आहेत. पोलीस वेल्फेअर फंडातून यासाठी ६५ लाख रूपयांची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत सरकारी निवासस्थानामध्ये राहता येईल, त्यांना कोणीही बाहेर काढणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही सरकारी निवासस्थान सोडण्याचं कोणतंही बंधन घालण्यात आलेलं नाही, असं देशमुख म्हणाले.
राज्य शासनानं घोषित केलेल्या साडेबारा हजार पोलिस कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये मराठा समाजावर कोणताही अन्याय होणार नाही. मराठा समाजातील १३ टक्के तरुणांना यामध्ये संधी मिळणार आहे. आवश्यक कायदेशीर बाबी तपासून १३ टक्के जागा राखीव ठेऊन ही भरती केली जाईल, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.