पुणे : लाॅकडाऊनमुळे सर्व हाॅटेल्स व खानावळी बंद झाल्याने पुणे शहरात राहत असलेले ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे माेठ्याप्रमाणावर हाल हाेत आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी आता विविध स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने (मनविसे) पुण्यातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना घरपाेच डबा पुरविण्यात येत आहे. शहरातील विविध भागांमधील नागरिकांसाठी ही सुविधा पुरविण्यात येत आहे.
देशभरात काेराेनाचा प्रसार माेठ्याप्रमाणावर वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी देशात लाॅकडाऊनची घाेषणा केली. त्यामुळे देशभरातील सर्व व्यवहार बंद झाले. त्याचबराेबर हाॅटेल्स व खानावळी देखील बंद झाल्या. पुण्यात राज्याच्या विविध भागांमधून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. त्याचबराेबर घरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या देखील अधिक आहे. हाॅटेल्स व खानावळी बंद झाल्याने या नागरिकांचे माेठ्याप्रमाणावर हाल हाेऊ लागले. त्यामुळे आता त्यांच्या मदतीसाठी मनविसे साेबत इनाेवेशन फाऊंडेशन व वाघमी फाऊंडेशन पुढे आले आहेत. या संस्थांकडून या नागरिकांना माेफत जेवणाचे डबे पुरवले जात आहेत.
शहराच्या विविध भागांमधील नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित स्वयंसेवकांचे क्रमांकही देण्यात आले आहेत. याबाबत माहिती देताना मनविसेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 21 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात पुणे शहरातील विद्यार्थ्यांचे जेवण तसेच वडगावशेरी मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये, जीवनावश्यक वस्तू, औषधी त्यांना पर्यंत सहज पणे घरबसल्या मिळाव्यात या हेतूने मनविसे सामाजिक दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवणाचा डबा तसेच जेष्ठ नागरीकांसाठी अत्यावश्यक मोफत सेवा देण्याचा संकल्पाला सुरुवात केली आहे.
अधिक माहितीसाठी 9623337777 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कल्पेश यांच्याकडून करण्यात आले आहे.