इंदापूर : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या इंदापूर तालुक्यातील, नागरिक विनाकारण फिरून कोरोना रोगाला आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसून येते आहे. पोलीस प्रशासनाने आरोग्य विभागाच्या मदतीने इंदापूर शहरात विनाकारण फिरणाऱ्या १६५ नागरिकांची तपासणी केली असता त्यातील २२ नागरिक कोरोनाबाधित आढळले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी सांगितले.
इंदापूर शहरातील बाबा चौक येथे सकाळपासून पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची थेट रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. तेथे कोरोनाबाधित आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाला रुग्णवाहिकेतून थेट कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात आले आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, तहसिलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा उपस्थित होते. तर कोविड टेस्ट एक्स्पर्ट अजीम तांबोळी, अमोल पाटोळे, वैभव वाघमारे यांनी नागरिकांची कोविड तपासणी केली.
राज्यात वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" च्या अंतर्गत इंदापूर पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य विभाग अहोरात्र मेहनत घेत आहे. त्याचबरोबर विकेंड लॉकडाऊन म्हणून घोषित केलेल्या शनिवार व रविवारी ही नागरिकांना प्रशासनाने केलेली विनंती समजत नसल्याने प्रशासनाला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी सांगितले.__________मागील मागील १५ महिन्यातील रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या
इंदापूर तालुक्यात शुक्रवारी ( दि. २३ ) ग्रामीण २५४ तर शहरी भागात ४६ असे एकूण ३०० कोरोनाबाधित रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत. मागील सव्वा वर्षात पाहिल्यांदाच कोरोनाच्या रुग्णांची रेकॉर्डब्रेक रुग्ण संख्या आढळून आल्याने, सर्वच विभागाचे प्रशासन शनिवारी प्रचंड ऍक्टिव्ह मोडवर आले होते. तर १५७ रुग्ण बरे करून घरी सोडण्यात आले तर ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.