पुणे : काेराेनाचा प्रभाव राज्यात वाढत असून राज्यात 17 जणांना काेराेनाची बाधा झाल्याचे समाेर आले आहे, तर पुण्यात आणखी एक काेराेनाबाधित रुग्ण आढळला असून आता पुण्यातील संख्या 10 झाली आहे. काेराेनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमिवर पर्यटन कंपन्यांना पर्यटन सहली रद्द करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असताना दुसरीकडे आयआरसीटीसी मात्र पूर्वनियाेजित सहल रद्द करण्यास तयार नाही. त्यामुळे या सहलीला जायचे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
आयआरसीटीसी मार्फत मथुरा, आग्रा, दिल्ली, हरिद्वार, ऋषिकेश, वैष्णवदेवी येथे सहलीचे आयाेजन केले हाेते. यासाठी प्रत्येकी 9 हजार चारशे 50 रुपये आकारण्यात आले हाेते. यासहलीत पुण्यातील उंड्री भागातील 14 नागरिकांनी सहभाग घेतला हाेता. 14 तारखेला ही सहल निघणार आहे. सध्या देशभरात सुरु असलेल्या काेराेनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमिवर ही सहल रद्द करावी अशी मागणी पुण्यातील नागरिकांनी आयआरसीटीसीच्या व्यवस्थापकांना पत्र लिहून केली. परंतु ही सहल रद्द करण्यास त्यांनी नकार दिला. तसेच पैसे परत करण्याबाबत कुठलिही स्पष्टता दिली नाही.
याविषयी या सहलीत सहभागी असलेल्या दीपाली कानडे म्हणाल्या, सध्या राज्यात आणि देशात काेराेनाचा उद्रेक हाेत असल्याने आम्ही ही सहल रद्द करण्याची किंवा पुढे ढकलण्याची मागणी केली. परंतु आयआरसीटीसीकडून ही सहल रद्द करण्यास नकार दिला. तसेच काेराेनाच्या पार्श्वभमिवर सहलीतील नागरिकांची आयआरसीटीसी काळजी घेईल असे आश्वासन त्यांनी दिले. रिफंड करण्याबाबत त्यांनी कुठलिही स्पष्टता दिली नाही. काेराेनामुळे नागरिकांच्या मनात भीती असल्याने अनेक नागरिक या यात्रेला जाण्यास उत्सुक नाहीत. याबाबत आम्ही पुण्याचे विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसकर यांच्याकडे देखील ही सहल रद्द करण्याची विनंती केली आहे.
दरम्यान आयआरसीटीसीशी आम्ही याबाबत चर्चा केली असून याेग्य ताे निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन म्हैसेकर यांनी शुक्रवारी आयाेजित पत्रकार परिषदेत दिले.