पुणे : देशात काेराेनाचे 29 रुग्ण आढळल्याने सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. हैद्राबादमधील एका महिला कर्मचाऱ्याला काेराेनाची लक्षणे आढळल्याने त्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचा पर्याय देण्यात आला. त्यामुळे आता पुण्यातील आयटी कंपन्यादेखील काेराेनाशी सामना करण्यासाठी खबदारी घेत आहेत. त्यात स्वच्छता राखण्यापासून ते माॅकड्रिल पर्यंतचे अनेक पर्याय कंपन्यांकडून अवलंबले जात आहेत.
गुरुवारी रात्री हिंजवडी येथील एका नामांकीत आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रात्री 9 च्या सुमारास कंपनी रिकामी करण्यास सांगण्यात आले. कंपनीतील एक कर्मचारी काही दिवसांपूर्वी इटली या देशातून आला हाेता. त्याला काेराेनाची लक्षणे आढळल्याने कंपनीने खबदारी म्हणून सर्वच कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगितले. तसेच वर्क फ्राॅम हाेमचा पर्याय दिला. यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली हाेती. कंपनी रिकामी झाल्यानंतर कंपनीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. परंतु हा सर्व प्रकार माॅकड्रिल असल्याचे समाेर आले. काेरेना बाधित एखादा कर्मचारी आढळल्यास कंपनी इतर कर्मचाऱ्यांची सुरक्षा करण्यास सज्ज आहे का हे पाहण्यासाठी हा माॅकड्रिल करण्यात आला. असाच प्रकार फुरसुंगी येथील कंपनीमध्ये देखील घडल्याचे समाेर आले आहे.
काेराेनाच्या पार्श्वभूमिवर आयटी कंपन्यांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व कर्मचाऱ्यांना काेराेनापासून संरक्षण करण्यासाठी काय काळजी घ्यायची याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तशा मार्गदर्शक सूचना कर्मचाऱ्यांच्या ई-मेलवर पाठवण्यात आल्या आहेत. तसेच कंपन्यांमध्ये त्या दर्शनीभागात लावण्यात आल्या आहेत. जे कर्मचारी आजारी आहेत त्यांना घरुन काम करण्यास सांगण्यात येत आहे. सर्व कंपन्यांमध्ये हॅण्ड सॅनिटायझर ठेवण्यात आले असून कर्मचाऱ्यांना त्याचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी यांना मास्क वापरण्याचे बंधन करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामानिमित्त परदेशात जायचे हाेते, त्यांना परदेशात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कंपनीमार्फत ज्या पार्टी किंवा सेमिनार आयाेजित करण्यात आले हाेते, ते तातडीने रद्द करण्यात आले आहेत.