जुन्नर : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर येथे पोलिस तपासणी नाक्यावर प्रभारी सहायक पोलिस अधिक्षक आँचल दलाल आणि पोलिस कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालल्या प्रकरणी तसेच दंडाची रक्कम पोलीसांच्या अंगावर फेकल्या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश जोरी यांनी फिर्याद दिली आहे. संचारबंदी दरम्यान दरम्यान जुन्नर येथील छत्रपती शिवाजी प्रवेशद्वार येथे पोलीसांनी तपासणी नाके उभारले आहेत. या तपासणी नाक्यावर नारायणगावकडुन येणारी फॅन्सी नंबर प्लेट असलेली कार पोलिसांनी अडविली. कारला फॅन्सी नंबर प्लेट लावली आहे, या कारणावरून जुन्नर पोलिसांनी चालकाला दंडाची पावती करण्यास सांगितले असता, कारमध्ये चालका शेजारी बसलेल्या आशा बुचके यांनी मोठ्याने ओरडत ‘‘तुम्ही मला ओळखत नाही का? मी आशाताई बुचके आहे. तुम्ही माझ्या गाडीची पावती कशी काय करता? मला जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिका-यांनी माझी मदत मागुन मला फिरण्यास सांगितले असताना तुम्ही मला आडवणारे कोण आहात ? असे म्हणत आरडाओरडा केला. यावेळी सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी बुचके याना तुम्ही आरडाओरडा करू नका. तुमच्या गाडीची नंबर प्लेट फँन्सी आहे. यामुळे तुम्हाला तिची रितसर पावती करावी लागेल असे समजावुन सांगितले. तरी देखील बुचके यांनी मी पावती फाडणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत आँचल दलाल यांना पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांना फोन करून तुमची नोकरी घालवते अशी धमकी दिली. तसेच इतर पोलिसांना या आधिकारी चार महिन्यासाठीच आहे, त्या गेल्यानंतर तुमची गाठ माज्याशीच आहे असे सुनावले.
समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला असताआशा बुचके यांनी कोणाचेही ऐकले नाही. त्यावेळी पावतीचे पैसे वाहनचालक देत असताना आशा बुचके यांनी त्यांनाही धमकावुन सांगितले की, तुम्ही अजिबात पैसे द्यायचे नाहीत. पोलिसांनी बुचके यांना दंडाची रक्कम भरण्यास सांगितले असता बुचके यांनी पोलिसांना पावतीची रक्कम तुमच्या खिशातुन भरा मी देणार नाही असे उद्धटपणे सांगितले. यावेळी बुचके यांनी दंडाची पावतीची रक्कम पोलिसांच्या अंगावर फेकुन देवुन हे पैसे मी भिक म्हणुन देत आहे, ते भिक म्हणुन घ्या, असे सुनावले. या नंतरही दंडाची पावती न घेताच त्या तेथून शिवीगाळ करत निघुन गेल्या. यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी बुचके यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक युवराज मोहिते पुढील तपास करत आहेत.