पिंपरी - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून लहान मुलांकरिता वायसीएममध्ये ऑक्सिजनचे दीडशे, आयसीयूचे तीस आणि पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात दीडशे बेडची व्यवस्था केली जाणार आहे, जिजामाता हॉस्पिटलमध्ये मुलांसोबत आईला राहता येईल, कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी २५ लाख डोस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आयुक्त पाटील म्हणाले, ‘‘कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लसीकरण पर्याय आहे. लस उत्पादक कंपनीकडून लस खरेदी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्तपणे जागतिक निविदा काढण्याबाबत चर्चा सुरु आहे. याबाबतच्या शक्यता पडताळल्या जात आहेत. लस उपलब्ध आहे का, लस किती मिळू शकते. कोणत्या दराने मिळेल. निविदेला प्रतिसाद मिळेला का, या बाबत माहिती घेतली जात आहे.’’
अशी असेल व्यवस्था
१) कोरोनाची तिसरी लाट जुलैनंतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले जाते. लहान मुलांवरील उपचारासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठीची यंत्रणा उभारली जाणार आहे.
२) लहान मुलांकरिता वायसीएममध्ये ऑक्सिजनचे दीडशे बेड राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यात आयसीयूचे तीस बेड, त्यातील नवजात बालकासाठी १५ आणि १८ वर्षाखालील मुलांसाठी १५ बेड राखीव असतील.
३) जिजामाता हॉस्पिटलमध्ये मुलांसोबत आईला राहता येण्याची सोय केली जाणार आहे. तसेच चिखली घरकुलमधील चार इमारतीत सीसीसी सेंटर केले जाईल. तेथे लक्षणेविरहित मुलांना ठेवले जाईल.
४) व्हेंटिलेटर, आयसीयू बेड उपलब्ध असलेल्या खासगी रुग्णालयांशी चर्चा सुरु आहे. शहरात १५० बालरोग तज्ज्ञ आहेत. गरजेनुसार त्यांची सेवा अधिग्रहित केली जाईल.
५) औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध केला जाईल. शहरातील १२ वषार्खालील मुलांची माहिती गोळा करत आहोत. कोणत्या परिसरात जास्त मुले आहेत. त्याची माहिती घेऊन जनजागृती केली जाणार आहे.
जुलैनंतर तिसरी लाट येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. शहरातील १८ ते ४४ या वयोगटातील १२ लाख लोकसंख्या आहे. त्यानुसार प्रत्येकाला दोन डोस यानुसार २५ लाख डोसची महापालिकेची मागणी आहे. लसीकरण करताना डोस वाया जातात. मात्र, इतर शहरांच्या तुलनेत लस वाया जाण्याचे प्रमाण कमी आहे.
- राजेश पाटील (आयुक्त )