पुणे: राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात १५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत लॉक डाऊन लागण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपले घर गाठण्याच्या उद्देशाने पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी जमा झाली आहे. बहुतांश नागरिक हे पर राज्यातील आहे. राज्यावर लॉकडाऊनचे सावट घोंघावत असल्याने सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. तसेच परप्रांतीय कामगारांमध्ये तर लॉकडाऊनच्या भीतीने मिळेल त्या मार्गाने पुन्हा एकदा घर गाठण्यासाठी प्रयत्न पावले उचलली आहे. त्यामुळे पुणे स्टेशनवर प्रवाशांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी धडकी भरवणारी आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय बैठकीनंतर टास्क फोर्ससोबत देखील चर्चा केली आहे. टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत कमीत कमी १५ दिवसांचा लॉक डाऊन असल्याचे स्पष्ट मत व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे लॉक डाऊन संदर्भातला निर्णय झाल्यातच जमा असून फक्त घोषणा होणे बाकी आहे. ती आज मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे.
त्याच धर्तीवर गावी जाण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे नसतानाही वाट पहात कोणत्या तरी गाडीत जागा मिळेल अशा आशेने हे नागरिक मुलाबाळांसहीत स्टेशनवर दाखल झाले आहेत. यामुळे स्टेशन परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे.
सध्या नोकरी नाही काम नाही तर थांबायचं कशासाठी असा सवाल विचारत नागरिकांनी गावाकडे जायला सुरुवात केली आहे. यामध्ये परराज्यातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.