पुणे : कोरोनाविरोधातील लढाईत डॉक्टर, नर्सेस, पॅरा मेडिकल स्टाफ, पोलीस आपलं कर्तव्य बजावत आहेत. या कोविड योद्ध्यांच्या जोडीलाच असे काही लोक आहेत जे कोरोनाच्या संकटाला हद्दपार करण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. ते म्हणजे रुग्णवाहिकांचे चालक. पुण्यातील तीन रुग्णवाहिका चालकांनी आत्तापर्यंत पाचशेहून अधिक कोरोनारुग्णांना वेळेत रुग्णालयापर्यंत पोहोचवलंय, त्यांना जीवनदान दिलंय.
विकास काजळे, तेजस कराळे, सुशील कराळे हे तिघे रुग्णवाहिकांचे चालक आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते हे काम करत आहेत. कोरोनाच्या संकटात देखील त्यांनी अविरत काम करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळला तेव्हापासून हे तिघे काम करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत एकही दिवस सुट्टी न घेता काम सुरू ठेवले आहे.
कोरोनाच्या रुग्णांना सेवा देत असल्याने हे तिघेही गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून घरी जाऊ शकले नाहीत. घरच्यांना संसर्ग होऊ नये म्हणून ते सध्या एकत्र राहतात. कोरोना संसर्गाच्या भीतीने मालकाने त्यांना घर सोडायला सांगितले. त्यामुळे त्यांची सोय आता पालिकेच्या दळवी रुग्णालयातील एका खोलीत करण्यात आली आहे.
विकास मूळचा बीडचा. सुरुवातीला पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने त्याने घरी जायचा निर्णय घेतला. परंतु, संकटसमयी असं निघून जाणं त्याच्या मनाला पटलं नाही. त्याने पुण्यात थांबून रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. विकास म्हणतो, ‘आधी थोडी भीती वाटली होती पण आता भीती मरून गेली आहे. जसे इतर रुग्ण असतात तसेच हे रुग्ण आहेत. आजार नवीन असला तरी योग्य खबरदारी घेतली तर संसर्ग होत नाही.’
तेजस म्हणतो, ‘रुग्णांना वेळेत रुग्णालयात घेऊन जाणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे रुग्ण कुठल्या आजाराने पीडित आहे याने फरक पडत नाही. आम्ही आमचे कर्तव्य करत राहणार. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून घरच्यांना भेटता आले नाही. आम्ही त्यांच्याशी फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून संपर्क करत असतो. आमचे घरचे सुरक्षित राहावेत एवढीच आमची प्रार्थना आहे.’
कोरोनामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. नातेवाईक रुग्णांना हात देखील लावायला तयार नाहीत. अशावेळी आम्ही कोरोनाच्या रुग्णांना देखील गरज पडल्यास उचलून रुग्णवाहिकेत ठेवतो, तसेच रुग्णालयातील वॉर्डापर्यंत घेऊन जाण्यास मदत करतो. आम्ही हे आमचे कर्तव्य समजतो आणि ते आम्ही करत राहणार आहोत, असं सुशीलने ठामपणे सांगितलं.
Disclaimer: ‘फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.’
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनापुढे अमेरिकाही हतबल! 24 तासांत आढळले तब्बल 68,428 नवे रुग्ण
CoronaVirus News : 'प्लाझ्मा दान करा आणि 5000 मिळवा'; 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : बापरे! कोरोनाग्रस्ताला आली पान मसाल्याची तलफ, रुग्णालयातून काढला पळ अन्...