मुंबई : मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये आज कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 64 वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला. याआधी कर्नाटकमधील कलबुर्गीमध्ये 63 वर्षीय व्यक्ती आणि दिल्लीमध्ये 69 वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रातील बुलढाण्याच्या एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सव्वाशेच्या वर गेली आहे, 17 मार्चला नवीन 7 रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात पहिले रुग्ण पुण्यामध्ये आढळले होते. पती-पत्नी आणि त्यांची मुलगी मार्चच्या पहिल्या आठवड्यात दुबईहून मुंबईत आले होते. यावेळी ते कॅबने पुण्याला गेले होते. पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना सर्दी, ताप जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. कारण त्यांना पुण्यात पोहोचविणारा कॅबचालकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यातही गंभीर बाब म्हणजे आज मुंबईमध्ये मृत्यू झालेला रुग्णही त्याच कॅबने आला होता.
मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर या 64 वर्षांच्या व्यक्तीने पुण्यातील पती-पत्नीसोबत कॅब शेअर केली होती. यानंतर त्यांना अधेरीतील घरी सोडून कॅब पुण्याकडे निघाली होती. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर या वृद्ध रुग्णाची तब्येत आणखीनच खालावली होती. उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. या वृद्धाची मुलगी आणि पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावरही कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे.
देशात 10 मार्चला 50 जण कोरोनाने ग्रस्त होते. तर आज ही संख्या 126 वर पोहोचली आहे. यापैकी 17 जण परदेशी नागरिक आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार आतापर्यंत 12 जण कोरोना व्हायरसशी लढा देऊन बरे झाले आहेत.
दरम्यान, थोड्य़ाच वेळात मुंबईतील लोकल सेवा बंद ठेवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असून पुण्यातही पुढील 3 दिवस हॉटेल, बार बंद ठेवण्याचा निर्णय हॉटेल मालकांच्या संघटनेकडून घेण्यात आला आहे.