कोरोना बधितांची संख्या आता पाचवर गेली असून आपल्या पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाला आहे. अवघ्या चोवीस तासांच्या आताच विलगीकरणाचे ३०० बेड्स नव्याने सज्ज करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नायाडू सांसर्गिक रुग्णालयात सुरुवातीला विलगीकरणाचे ६ बेड्स उपलब्ध करण्यात आले होते. मात्र पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आरोग्य विभागाने युद्धपातळीवर काम करत ३०० बेड्सची व्यवस्था केली असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
आरोग्य विभागाने केलेल्या तयारीचा आज पुन्हा एकदा सविस्तर आढावा घेतला असून शहराच्या विविध भागांत तीन ठिकाणी ३०० विलगीकरण बेड्स सज्ज केले आहेत. महापालिकेने पूर्ण क्षमतेने तयारी केलेली असून यासाठी सर्व पातळ्यांवर सर्वच घटकांचे सहकार्य घेतले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची जबाबदारीने काळजी घ्यायला हवी.
पुणे शहरात कोरोनाचे रूग्न आढळल्याचे समोर आल्यानंतर पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेला नागरिकांची आणि क्रीडा प्रेमींची मोठी गर्दी होत असते, त्यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतला आहे. या चषक अंतर्गत यंदा ३६ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येत होती. त्यातील साधारण निम्म्या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा पूर्ण झालेल्या आहेत. मात्र उरलेल्या स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आल्या आहेत. नजीकच्या काळात या स्पर्धा घेण्याचा विचार आहे.