पुणे : कोरोना नियंत्रणाबाबत भारतात वैविध्यपूर्ण परिस्थिती आहे. हॉटस्पॉट जिल्ह्यांच्या संख्येत एकीकडे घट होत आहे. तर ग्रीन झोनमधील जिल्ह्यांच्या संख्येतही घट झाली आहे. काही ठिकाणी दिलासा, तर काही ठिकाणी नव्याने संसर्ग होत आहे. एकूणच देशभरातील लॉकडाऊन मे अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पंधरा दिवसांत हॉटस्पॉट जिल्ह्यांची संख्या १७० वरून १२९ पर्यंत घटली. मात्र याच काळात ग्रीन झोन (ज्या जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही) जिल्ह्यांच्या संख्येतही ३२५ वरून ३०७ पर्यंत घट झाली. म्हणजे ग्रीन झोन असलेल्या १८ जिल्ह्यांत नव्याने कोरोना संसर्ग झाला. मात्र दुसरीकडे आॅरेंज झोन (कोरोनाबाधित आहेत, मात्र हॉटस्पॉट नाहीत असे जिल्हे) जिल्ह्यांच्या संख्येतही घट झाली. एकूणच धोकादायक भागात परिस्थिती सुधारत असली तरी ग्रीन व आॅरेंज झोनमधील संसर्ग चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत केंद्रसरकारने लॉकडाऊन संपविण्यापेक्षा झोननिहाय उपाययोजना राबविण्याची गरज तज्ञांनी व्यक्त केली आहे. रेड झोन जिल्ह्यात विभागांची संपूर्ण नाकाबंदी आदी अधिक कडक उपाययोजना राबवाव्यात. ग्रीनझोन जिल्ह्यात जिल्हा बंदी करावी व अत्यंत मर्यादित आस्थापनांना परवानगी द्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.पल्मोन्युलॉजी अॅण्ड क्रिटिकल केअर फोर्टिस नॉईडा येथील अतिरिक्त संचालक डॉ. राजेशकुमार गुप्ता यांनी रेड झोनमधील लॉकडाऊन आणखी दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ वाढविला पाहिजे. ग्रीन झोनमधील निर्बंध थोडे शिथील करता येतील. मात्र त्याठिकाणी रेड किंवा आॅरेंज झोनमधून ये-जा होणार नाही याची दक्षता घेणे, फिजिकल डिस्टन्स बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले. फुप्फुसतज्ञ डॉ. अरविंद कुमार यांनी सर्व प्रवासी वाहतूक, मॉल, धर्मस्थळे आणखी काही काळ बंद ठेवावीत, असे सुचविले आहे.कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मे महिन्यातील कडक उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत. मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल केल्यास संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमीत कमी एक महिना तरी लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मत मॅक्स हेल्थकेअरचे डॉ. रॉमेल टिक्कू यांनी व्यक्त केले.>देशातील पंधरा जिल्ह्यांवर लक्ष; सात अत्यंत घातकदेशातील १५ जिल्ह्यात कोरोनाबाधित व मृतांची संख्या खूप जास्त आहे. त्यातील ७ जिल्ह्यात तर अत्यंत घातक स्थिती आहे. केंद्र सरकारने या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केले असून, तेथे सर्व प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत. हे जिल्हे जितक्या लवकर कोरोनामुक्त करता येतील त्याच्यावर भारताचे यश अवलंबून असेल, असे निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी टिष्ट्वट केले आहे.
CoronaVirus News: धोका वाढला! संपूर्ण मेही जाणार लॉकडाऊनमध्येच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 4:49 AM