पुणे : पुणे शहरात आयसीयु बेड्सच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता शहराला कोरोनाच्या साथीत मिळालेले पीएम केअरचे जवळपास ५८ व्हेंटिलेटर हे खराब झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. कोरोना लढ्यात महत्वाचे असणाऱ्या ससून रुग्णालयातील हे व्हेंटिलेटर आहेत. त्यामुळे रुग्णालयावर आता उरलेल्या व्हेंटिलटरवर कसंबसं भागवायची वेळ आली आहे.
पुण्यामध्ये मुळातच व्हेंटिलेटरची कमतरता आहे. आजच केंद्र सरकारकडून शहरासाठी १६५ नवे व्हेंटिलेटर देण्याची घोषणा करण्यात आली. हे व्हेंटिलेटर येई पर्यंत उपलब्ध सर्व व्हेंटिलेटर भरलेले आहेत. मात्र त्यातच गेल्या वर्षभरात आलेले हे व्हेंटिलेटर खराब झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती ससुन मध्ये निर्माण झाली आहे.
आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ससूनच्या डीनने ही बाब मांडली. याविषयी बोलताना ससूनचे एक कर्मचारी म्हणाले “ पीएम केअरचे व्हेंटिलेटर आले होते. त्यापैकी ६०-७० टक्के व्हेंटिलेटर बंद पडले आहेत. सध्या आम्ही इतरांकडून मिळालेल्या व्हेंटिलेटरवर काम चालवत आहोत. सध्या ससुन मध्ये ८७ व्हेंटिलेटर असून ते सर्व आता वापरात आहेत”