पुणे : पुण्यातल्या ॲाक्सिजन पुरवठ्यामध्ये सुरु असलेला गोंधळ आता गंभीर होत चालला आहे. यातच आता शहरातील ४०-५० लहान रुग्णालयांनी ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांना दाखल करून घेणे थांबविले आहे. यामुळे आरोग्य सेवेत एकूणच गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून ॲाक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. तुटवड्या अभावी रुग्णालयांवर कोरोना रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची वेळ आली होती. पण अडचण असतानाही ऑक्सिजन मिळत नसल्याने आता शहरातील लहान रुग्णालयांनी कोरोनाचे रुग्ण दाखल करून घेणे थांबविले आहे. या रुग्णांना दुसऱ्या मोठ्या रुग्णालयांमध्ये जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
पुणे शहरातल्या १२० पैकी ४०-५० रुग्णालयांमध्ये अशी परिस्थिती आहे. "ऑक्सिजन अभावी रुग्ण मॅनेज करायला अडचण येत आहे. जर हॅास्पिटल मधून रुग्णाला शिफ्ट करायची वेळ आली तर नातेवाईकांकडून तोडफोड करण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे या छोट्या रुग्णालयांनी रुग्णांना भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांना मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला त्यांच्याकडून देण्यात आहे, असे पुण्यातील हॅास्पिटल बोर्ड ॲाफ इंडियाचे चेअरमन डॉ. संजय पाटील यांनी 'लोकमत'ला सांगितले.
याचबरोबर, प्रशासनाने आज ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले आहे. यानंतर पुन्हा या लहान रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरु होईल."