वाकड : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळल्याने शिक्षण व नोकरीनिमित्त येथे वास्तव्य करणाऱ्या बॅचलर्सना मूळ गावाने देखील नाकारले तर काहींना वाहतुक व्यवस्थेचा फटका बसल्याने पुण्यातच अडकून पडावे लागले त्यामुळे बंद घरातूनच करोनाचा सामना कारणाऱ्या अशा सर्वांचा निर्माण झालेला पोटाचा मोठा प्रश्न टीएसएफ या समाजसेवी संस्थेने सोडविला आहे.
कोरोनाने संपूर्ण जगात आपले पाय पसरविले आहेत तर देशात देखील अत्यंत भयावह परस्थिती निर्माण झाल्याने शासनाने सर्वत्र संचार बंदी करीत सर्व आस्थापना परिस्थिती अटोक्यात येई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देत सर्वानी घरी राहुन या कोरोना विषाणु विरोधात लढा देण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यामुळे पुण्यात शिक्षणानिमित्त राहणाऱ्या विद्यार्थी तसेच नोकरदार,आयटीयन्सना व कामगारांची मोठी पंचाईत झाली आहे या सर्वांचे खाण्याचे वांदे झाले आहेत.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन थेरगाव येथील थेरगाव सोशल फाउंडेशन (टीएसएफ) या समाजसेवी संस्थेने अशा सर्वाना सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवणाच्या डब्यांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार २२ मार्च पासुन घरी बनवून ना नफा ना तोटा या तत्वावर जेवनाचे डबे घरपोच पुरवीले जात आहेत. संस्थेच्या सभासदांनी आजपर्यंत तब्बल दोनशेहून अधिक अडकून पडलेल्या बंदिस्त विद्यार्थी व आयटीयन्सना डबे पुरविले आहेत. शंतनू तेलंग, यश कुदळे, विट्ठल कूदळे, अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, निलेश पिंगळे, अनिल घोडेकर, अंकुश कूदळे श्रीकांत धावारे, अमोल शिंदे इत्यादी सभासद पुढाकार घेऊन विविध भागात जाऊन डबे पोहोच करीत आहेत.