पुणे : पुण्यात कोरोना विषाणूचे रूग्ण झपाट्याने वाढत असून, गुरूवार (दि.2) रोजी एकाच दिवशी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 9 ने वाढली आहे. यामध्ये पुणे शहरामध्ये 7 तर पिंपरी चिंचवड मध्ये 2 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. यामुळे गेल्या 24 दिवसांत पुण्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 60 वर जाऊन पोहचली आहे.
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे. गुरूवारी दिवसभरात पुण्यात 83 कोरोना संशयित व्यक्तींना शहर आणि जिल्ह्यातील विविध रूग्णालयांत दाखल करण्यात आले. यापैकी 81 व्यक्तींचे स्वॅब एनआयव्हीला पाठविण्यात आले. यामध्ये 9 व्यक्तींचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. पुण्यात कोरोना बाधितांचा वाढता वेग लक्षात घेता आता जिल्हा प्रशासना समोर मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांना आपल्या घरांमध्येच थांबण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.