बारामती : बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात दुसरा कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ३ मे रोजी हा रुग्ण उपचारासाठी त्याच्या मुंबई येथील नातीकडे गेला आहे. ४ मे रोजी केलेल्या तपासणीमध्ये त्याचा अहवाल ' पॉझिटिव्ह ' आल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती तालुक्यातील कटफळ येथील हा रुग्ण असून ग्रामीण भागातील दुसरा तर, बारामती परिसरातील हा नववा रुग्ण आहे. त्याच्यावर मुंबई येथे शहरात उपचार सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.शहरात श्रीरामनगर, समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरसह तालुक्यात माळेगाव येथे आजपर्यंत एकूण आठ रुग्ण सापडले आहेत. त्यापैक भाजीविक्रेता असणाऱ्या रुग्णासह माळेगाव येथील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शेवटच्या रुग्णाला ३० एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. बारामती कोरोनामुक्त झाल्याच्या आनंदात बारामतीकर होते, हा आनंद अल्पावधीचाच ठरला आहे .नववा रुग्ण सापडल्याचा अहवाल बारामतीकरांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज सापडलेला रुग्ण कटफळ येथील आहे. ग्रामीण बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील दुसरा रुग्ण असल्याने ग्रामीण भागात लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणीच बाहेर फिरू, नये घरात राहावे, अशी सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
सदरची परिस्थिती लक्षात घेता कटफळ गाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्या क्षेत्रात सर्व प्रकारची वाहतूक नियंत्रित करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळले असून, झोनच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथून सर्व वाहने तपासणी करून सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच त्या भागात आरोग्य विभागामार्फत तातडीने सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. एमआयडीसीतील कंपन्यांना कटफळ परिसरातील कामगारांना कामावर घेताना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.आज सापडलेल्या रुग्णाच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला अपचनाचा त्रास होत होता. त्यामुळे तो ३ मुंबई येथील नातीकडे गेला होता. त्या ठिकाणी केलेल्या तपासणीत त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला कोणत्या ठिकाणी कोरोना संसर्ग झाला हे प्रशासन शोधावे लागणार आहे. बारामती ऑरेंज झोन होण्याचा मार्ग खडतर झाला आहे. येथील दुकाने सुरू होणार का हा प्रश्न सध्या तरी कायम आहे. नुकतीच कालपासून एमआयडीसी सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे.