बारामती ः बारामती शहरातील रुई येथील शासकीय रुग्णालयामध्ये कोरोना बाधित पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रुग्णांवर उपचार होणार आहेत. यासाठी 20 खाटांचे विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ञांची टीम पाठवून व आवश्यक संसाधने देण्यात येतील. दोन दिवसात विलगीकरण कक्ष कार्यानवीत करा अशा, सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील प्रशासनास केल्या आहेत.
बारामती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि.19) बारामती येथील कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बारामती शहरामध्ये 7 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.तर उपचारादरम्यान एक रुग्ण दगावला आहे. त्यामुळे बारामती तालुका रेड झोनमध्ये आहे. दोन दिवसापूर्वीच राज्य शासनाने बारामती येथील शासकीय महाविद्यालयात कोरोना चाचणीसाठी परवानगी दिली आहे. येथील लॅब देखील चार दिवसात सुरू करा, असे आदेश पवार यांनी दिले. तसेच काही गोष्टींची कमतरता असेल तर त्वरित कळवा अशा सुचना देखील पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सदानंद काळे यांनी रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या औषधंची यादी पवार यांच्याकडे दिली. ही औषधे त्वरित पाठवण्यात येतील असे यावेळी पवार यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर, मुख्याधिकारी योगेश कडुस्कर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.
सकाळी 9 ते 11 बेकरी सुरू राहणार लॉकडाऊनच्या काळात बेकरी बंद करण्यात आल्या होत्या. सकाळी 9 ते 11 यावेळेस बेकरी सुरू ठेवाव्या, व गर्दी टाळण्यासाठी या पदार्थची होम डिलेव्हरी करावी. बारामती शहरासाठी भाजीपाला किराणामाल, धान्य कमी पडू देऊ नका. काही अडचणी असतील तर कळवा. परंतु शक्यतो अडचणी त्वरित सोडवण्यावर भर द्या. शेतीची कामे सुरू करू द्या. मजुराना पास द्या. शेती संबंधित खते बी बियाणे यांची कमतरता पडू देऊ नका. अशाही सुचना पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
सरसकट सर्वांच्या चाचण्या करा...बारामतीमध्ये आढळून आलेल्या रुग्णांच्या परिसरातील सरसकट सर्व व्यक्तींच्या देखील कोरोना चाचण्या करा असे देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले. बारामती रेड झोनमध्ये असल्याने इतक्यात येथील एमआयडीसी सुरू करता येणार नाही. त्यामुळे या परिसराती सुमारे अडीच हजार मजुरांना शासकीय योजनेतून थेट घरपोच जेवण देण्यात येणार आहे. याआधी हे जेवण चाकण येथून बारामतीमध्ये येत होते. तर बांधकाम मजुरांसाठी बारामतीमध्येच जेवण तयार करण्यात येणार आहे.