पुणे : घराबाहेर नाहीतर टेरेसवर फिरण्याचा मार्ग नागरिकांनी निवडला आहे. सातत्याने घरात बसा, बाहेर पडू नका, एकत्र येऊन गर्दी करू नका, असे सांगून देखील नागरिकांकडून बेशिस्तपणाचे प्रदर्शन होताना दिसत आहे. अशा उद्दाम नागरिकांना अद्दल घडविण्यासाठी पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
बिल्डिंगच्या टेरेसवर घोळका करून गप्पा मारणाऱ्या, फिरणाऱ्याविरोधात पोलिसांनी ड्रोनद्वारे वॉच ठेवला आहे. ज्या व्यक्ती पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करतील त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला. मध्यभागातील दाट वस्तीच्या नाना, भवानी पेठ, रास्ता पेठ परिसरातील सोसायटींच्या छतावर नागरिक जमा होत आहेत. कोरोनामुळे नागरिकांनी सामाजिक अंतर राखावे तसेच शक्यतो घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. करोनाचा संसर्गाला अटकाव घालण्यासाठी नागरिकांनी शक्यतो गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले असताना नाना पेठ, भवानी पेठ, रास्ता पेठ भागातील सोसायटीच्या छतावर नागरिक जमा होत असल्याचे समर्थ पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे छतावर जमा होऊन विनाकारण आरडाओरडा करणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सोसायटीच्या छतावर जमणारे तसेच तळमजल्यावर जमा होणाऱ्या नागरिकांवर ड्रोन कॅमे-यांद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. जमावबंदीच्या आदेशाचा भंग करणा-यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.