पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र रस्त्यावर तैनात असणा-या पोलिसांना विसावा घेता यावा, विविध ठिकाणी राहाणा-या ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यागांना औषधे व बँकेची कामे करण्यास मदत मिळावी, अडकलेल्या व्यक्तींना अन्न वितरित करता यावे, आदी कामांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस ) विद्यार्थ्यांना कोरोना विरूध्दच्या लढ्यात उतरविण्याचा निर्णय रविवारी विद्यापीठ प्रशासनातर्फे घेण्यात आला.त्यासाठी आवश्यक खबरदारीही घेतली जाणार आहे. यात 60 हजार विद्यार्थी सहभागी हाेणार आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी रविवारी ऑडियो कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील एनएसएसचे समन्वयक व संबंधित वरिष्ठ अधिका-यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.तसेच एनएसएसच्या माध्यमातून कोरोना विरूध्दच्या लढ्यात हातभार कसा लावता येईल याबाबत चर्चा केली.
डॉ.करमळकर म्हणाले, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थीत पोलीस, डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय आदी महत्वाचे योगदान देता आहेत. या सर्वांना मदतीचा हात देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने पुढाकार घेतला असून पाबळ येथील डिझाईन इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून डॉक्टरांना गार्ड तयार करून दिले जाणार आहेत. तसेच विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर मास्क व सनिटायझर तयार करून त्याचे गरजूंना व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना वितरण करण्यात येणार आहे. तसेच अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातही पुढील काळात सनिटायझरची निर्मिती करण्याचा विचार आहे.
राज्य शासन व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या नियमावलीच्या अधिन राहून एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थी समाजातील गरजूंना मदत करू शकतात. शहरी व ग्रामीण भागात रहाणा-या एनएसएस विद्यार्थ्यांच्या सहाय्याने सुमारे पाच लाख कुटुंबापर्यंत पोहचाता येऊ शकते, याबाबत ओडियो कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वांशी चर्चा करण्यात आली.
कोरोनामळे समाजिक, आर्थिक, कौटुंबिक जीवनावर तसेच जीवन पध्दतीवर व दैनंदिन आहारावर परिणाम झाला आहे.त्यामुळे यावर प्रश्नावली तयार करून लोकांशी बोलून त्यावर पुढील काळात अहवाल तयार केला जाणार आहे.
- डॉ. नितीन करमळकर,कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ