पुणे : भारतात ‘कोविड-१९’ या रोगाची लागण झाली अथवा नाही, याची चाचणी घेण्याचे प्रमाण कमी असल्याने जगातील इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमी असल्याचे मत देशातील तसेच देशाबाहेरील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. असे असले तरी, देशातील कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला सुमारे ८ आठवडे उलटली आहेत. तरीही अद्याप ‘कोविड-१९’ या रोगाची लागण झाली अथवा नाही, याची चाचणी न केलेल्या मात्र, या आजाराची लक्षणे आढळल्यामुळे डॉक्टरांकडे धाव घेणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रासह देशात खूपच मर्यादित आहे.
भारतात ३१ जानेवारीला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला होता. त्या घटनेला बुधवारी (दि. २५) ५४ दिवस म्हणजेच सुमारे ८ आठवडे लोटले आहेत. या काळात भारतात सुमारे २२ हजार ९२८ चाचण्या झाल्या. यात आतापर्यंत ६१२ जण पॉझिटिव्ह (४० जण बरे झाले, १० जणांचा मृत्यू, ५६२ जणांवर अद्याप उपचार सुरू) आढळले. इटलीत या ५४ दिवसांच्या काळात बाधितांची संख्या २ वरून ६९ हजार १७६ इतकी प्रचंड वाढली आहे. यादरम्यान तेथे २ लाख ९६ हजार ९६४ चाचण्या घेण्यात आल्या. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये बाधितांची संख्या अनुक्रमे ५५ हजार २३८ आणि ८ हजार १६७ इतकी आहे.
कोरोनाची लागण झाली अथवा नाही, याची तपासणी करणाºया चाचण्या आपल्याकडेअतिशय कमी प्रमाणात झाल्या हे खरे आहे. मात्र, अशी चाचणी न केलेल्या पण 'कोविड-१९' या आजाराची लक्षणे आढळली म्हणून डॉक्टरांकडे धाव घेणारे रुग्ण आळल्याची नोंद अपवाद वगळता दिसत नाही. ही जीवघेणी साथ आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. यामुळे माहिती उपलब्ध होण्यावर मर्यादा आली असली तरी सोशल मीडिया या लॉक डाऊनच्या काळात पूर्वीपेक्षा जास्त अॅक्टिव्ह झाला आहे. ‘कोविड-१९’ची चाचणी न झालेले पण या आजाराची लक्षणे आढळणारे रुग्ण देशात लक्षणीय प्रमाणात आढळले असते तर सोशल मीडियावर याचे पडसाद नक्कीच उमटले असते. शिवाय, आरोग्य खात्याकडेदेखील तशी नोंद झाली असती. मात्र, या दोन्ही पातळीवर अद्यापपर्यंत तरी चिंता वाढावी, असा प्रतिसाद आलेला नाही. याचा अर्थ, या रोगाचा शिरकाव झाल्याच्या ८ आठवड्यानंतर म्हणजे, आतापर्यंत तरी 'कम्युनिटी इन्फेक्शन' अर्थात सामाजिक लागण होण्याचा टप्पा नियंत्रणात ठेवण्यामध्ये शासन, प्रशासन आणि जनता यशस्वी ठरल्याचे चित्र आहे.
... तरीही चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवेइतर देशांमध्ये हा विषाणू ज्या वेगाने पसरला आहे, तितके जास्त प्रमाण आपल्या देशात कदाचित नसेलही. पण, सामुहिक लागण होण्याच्या टप्प्यात आपण सध्या आहोत. या टप्प्यात ‘कोविड-१९’ची लागण नियंत्रणात ठेवण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण आपण वाढवायला हवे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांशी शिफारस पुरेशी ठरविण्यात यावी. सध्या असे होत नाही. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांच्या अंंतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांनी सुचविल्यास संबंधित संशयिताची चाचणी घेणे सुरू करायला हवे. असे झाल्यास आपण हा आजार पसरण्याला अधिक जास्त प्रमाणात प्रतिबंध करू शकू.- डॉ. अनंत फडके, सहसमन्वयक, जनआरोग्य अभियान