निनाद देशमुखपुणे : देशावर कोरोना विषाणूचे संकट आहे. या संकटाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाउन संपूर्ण देशात लागू केला आहे. कोरोनाशी लढतांना आरोग्य विभागाला मास्क, सॅनिटाईजर तसेच विषाणू विरोधी पोषाख, कृत्रीम श्वासोच्छस्वास यंत्रणा (व्हेंटीलेटर) याची कमतरता भासत आहे. बाहेरील देशातून हे सर्व आयात केले जात आहे. यामुळे आयुध निर्माण कारखाने देशातच याचे उत्पादन बनविण्यासाठी पुढे असून आॅर्डनंन्स फॅक्टरी बोर्डाच्या पाच कारखान्यात याचे ऊत्पादन करण्यास सुरूवात झाली आहे.
चीन, अमेरिका, इटली पाठोपाठ देशातही कोरोना कोव्हीड १९ च्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. आतापर्यंत चौघांचे मृत्यू देशात या आजारामुळे झाले आहेत. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. लष्करातर्फेही चार राज्यात विलगीकरण कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. या रोगाला टाळण्यासाठी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत तसेच मास्क लाऊन राहावे अशा सुचना आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहेत. तसेच रूग्णांची तपासणी करतांना आरोग्य कर्मचा-यांना विषाणू संक्रमण विरोधी पोषाख गरजेचा असतो. देशात या सर्वांची मागणी वाढल्याने याचा तुटवडा भासू लागला आहे. देशातील औषधयांमध्ये सॅनिटायझर मिळत नसल्याने बनावट सॅनिटायझर बनवून विकल्या जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यामुळे या वस्तूंची कमतरता भासू नये तसेच आरोग्य विभागाला मदत व्हावी या हेतूने लष्करापाठोपाठ आता देशातील आयुध निर्माण कंपन्यांनीही कोरोना विरूद्ध लढाईत पुढाकार घेतला असून सॅनिटायझ, मास्क, आणि विषाणू संक्रमण विरोधी पोषाख बनविण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार चेन्नईजवळील आवडी येथील आॅर्डनंन्स क्लोदिंग फॅक्टरी आणि सहजपुर येथील आॅर्डनंन्स क्लोदिंग फॅक्टरीत मास्कचे आणि संक्रमण विरोधी पोषाखाचे उत्पादन घेण्यास सुरूवात झाली आहे. तर कानपुर येथील आॅर्डनंन्स ईक्वविपमेंन्ट फॅक्टरीतून विलगीकरण कक्ष उभारणीसाठी लागणा-या तंबू बनविण्याचे काम सुरू आहे. जबलपूर आणि इटारसी येथील कारखान्यातून सॅनिटायझर बनविण्यात येत आहेत. तर हेद्राबाद येथील मेढक जिल्ह्यातील आॅर्डनंन्स फॅक्टरीतून कृत्रीम श्वासोच्छस्वास यंत्रणला (व्हेंटीलेटर) लागणारे हार्डवेअर बनविण्यात येत आहेत. मागणीनुसार याचा पुरवठा करण्यासही सुरूवात झाली आहे.
विलगीकरण कक्षासाठी २८५ खाटांची निर्मीतीकोरोनाग्रस्त रूग्णांचे विलगीकरण करण्यासाठी खांटांची आवश्यकता असते. आयुध निर्माण कारखान्याकडून आतापर्यंत आधूनिक २८५ खाटांची निर्मिती करण्यात आली असून लष्कराच्या विविध रूग्णालयात त्या वितरीत करण्यात आल्या आहेत.
आयुध निर्माण कारखान्यांनी देशांच्या सुरक्षेत आतापर्यंत महत्वाचे योगदान दिले आहे. सध्या संपूर्ण जग करोनाशी लढत आहेत. देशातही आरोग्य यंत्रणा कोरोनाशी मुकाबला करत आहेत. मात्र, आरोग्य यंत्रणेला मास्क, सॅनिटायझर, व्हेंटीलेटर या सारख्या साधनांची कमतरता भासत आहे. देशातील सध्याची परिस्थीती युद्धासारखीच आहे. यामुळे आयुध निर्माण कारखान्यांनी हे साहित्य देशातच उत्पादित करण्याचा निर्णय घेऊन ते आरोग्य विभागाला वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. - संजय मेनकुदळे, भारतीय प्रतिरक्षा मजदुर संघ