नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. युरोप, चीन आणि अमेरिकेत हजारो जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर भारतातही आता कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्वच जण सध्या जीव मुठीत धरून वावरत आहेत. दरम्यान, असाच एक प्रकार पुणे विमानतळावर समोर आला आहे.महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पुण्यातून एअर एशियाचे विमान दिल्लीसाठी उड्डाण करण्यासाठी सज्ज होते. सर्व प्रवासी आपापल्या जागेवर बसले. विमानातील कर्मचाऱ्यांनी उड्डाणाची तयारी सुरू केली होती. तेवढ्यात विमानात पहिल्या रांगेत बसलेल्या एका प्रवाशाने सटासट शिंकण्यास सुरुवात केली. त्याला सर्दीही झाली होती. हा प्रकार पाहून विमानातील चालक दल गोंधळले, घाबरले. विमानाच्या वैमानिकाने खबरदारी म्हणून कॉकपीटमधील आपत्कालीन दरवाजातून विमानाबाहेर पडणे पसंद केले.
दरम्यान, विमानातील इतर कर्मचाऱ्यांनी विमानाचा मागचा दरवाजा उघडला. त्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना मागच्या दाराने बाहेर काढण्यात आले. तर संशयास्पद दिसणाऱ्या या प्रवाशाला समोरील दाराने बाहेर काढण्यात आले.
त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रवाशांची स्क्रिनींग करण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे सर्व प्रवाशांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. दरम्यान, समोरील गेट सुरक्षित घोषित करण्यात येईपर्यंत विमानातील कर्मचाऱ्यांनी स्वतःला क्वारंटिन करून घेतले. त्यानंतर संपूर्ण विमानात अँटी इन्फेक्शन लिक्विडची फवारणी करण्यात आली, आहे एअर एशियाच्या प्रवक्त्याने सांगितले.