पुणे : केंद्र सराकराने काेराेनाबाधित शहरांच्या व्यतिरिक्त इतर देशांमधून मुंबई विमानतळावर आलेल्या आणि तेथून पुण्यात आलेल्या नागरिकांना आता हाेम क्वारनटाईन करण्यात येणार आहे. गेल्या दाेन दिवसांपासून जे इतर देशांमधून पुण्यात आले आहेत त्यांच्या हातावर हाेम क्वारनटाईनचा शिक्का मारुन त्यांना चाैदा दिवस घरात विलग राहण्यास सांगण्यात येणार असल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने जगभरातील सात देश सर्वाधिक काेराेनाबाधित देश म्हणून घाेषित केले आहेत. त्यात आणखी चार देशांची वाढ करण्यात आली आहे. या देशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर तपासणी करुन त्यांना लक्षणे असल्यास विलगीकरण केंद्रात पाठविण्यात येते. तसेच इतरांना घरीच विलग राहण्यास सांगण्यात येते. परंतु या देशांव्यतिरिक्त इतर देशांमधून येणाऱ्या नागरिकांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना घरी साेडण्यात येत हाेते. राज्यात काेराेनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये केंद्राने जाहीर केलेल्या सात देशांच्या व्यतिरिक्त इतर देशांमधून आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून ज्यांना काेराेनाची लक्षणे आहेत त्यांना विलगीकरण केंद्रात पाठविण्यात येणार आहे. तर इतर प्रवाशांच्या हातावर हाेम क्वारनटाईनचा शिक्का मारुन त्यांना काही दिवस घरीच राहण्यास सांगण्यात येणार आहे.
दरम्यान गेल्या दाेन दिवसांपासून विदेशातून मुंबई विमानतळावर उतरुन पुण्यात आलेल्या नागरिकांचा देखील शाेध घेण्यात येणार आहे. त्यांच्या हातावर हाेम क्वारनटाईनचा शिक्का मारुन त्यांना काही दिवस घरीच विलग राहण्याच्या सुचना देण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांना हाेम क्वारनटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे, ते इतरत्र बाहेर फिरत नाहीत ना हे तपासण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. असे काेणी आढळल्यास त्यांना ताब्यात घेऊन इन्स्टिट्युशनल क्वारनटाईन करण्यात येणार आहे.