पुणे : संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि.24) पासून खाजगी वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बंदी घातली आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
गेल्या पंधरा दिवसांत पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आता सर्व प्रकारच्या दुचाकी, चारचाकी व अन्य कोणत्याही स्वरूपाच्या वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यावर व विक्रीकर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांसाठी आवश्यक असलेल्या वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरताना संपूर्ण खात्री करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच या वाहनांमध्ये देखील एका वेळीच टाकी फुल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.