पिंपरी : कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. प्रवाशांना प्रवास करण्यासाठी ५०० ते ६०० रुपयांना हा बनावट रिपार्ट देण्यात येत होता. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २८ बनावट प्रमाणपत्र, तीन हजारांची रोकड, दोन मोबाइल फाेन, असा एकूण ३० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.राकेशकुमार बस्तीराम वैष्णव (वय २५, धनकवडी, पुणे), पत्ताराम केसारामजी देवासी (वय ३३, रा. वाकड), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह चिरंजीव (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही), राजू भाटी (रा. वाकड) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॅान्स्टेबल कुणाल दिलीप शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे ५०० ते ६०० रुपये घेऊन कोरोनाचा रिपोर्ट देत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ५०० रुपये देऊन एका इसमाला रिपोर्ट घेण्यासाठी पाठवले. त्यानंतर त्याच्या व्हाटसअपवर कोरोना निगेटिव रिपोर्टची फाईल होती. त्यावरून पोलिसांनी आरोपी वैष्णव व देवासी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडी मोबाइलमधील व्हाटसअपवर कोरोना निगेटिव रिपोर्टच्या काही पीडीएफ फाईल मिळून आल्या. आरोपी राजू भााटी आणि चिरंजीव यांनी हे रिपोर्ट बनवून दिल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. बावधन येथील लाइफनिटी वेलनेस इंटरनॅशनल यांच्या नावाचे हे रिपोर्ट असल्याने पोलिसांनी त्याबाबत चौकशी केली असता कोरोनाचे ते रिपोर्ट बनावट असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी वैष्णव व देवासी यांना अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक निरीक्षक सागर काटे, उपनिरीक्षक समाधान कदम, यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी बंडू मारणे, महेश वायबसे, किरण पवार, बाळकृष्ण शिंदे, नितीन पराळे, कुणाल शिंदे, शिवराम भोपे, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, सुभाष गुरव, दत्तात्रय शिंदे, झनक गुमलाडू, नूतन कोडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.