पुणे : शहरातील गुलटेकडी परिसरातील एका झोपडपट्टीमध्ये दोन कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. या परिसरातील जवळ जवळ असलेल्या दोन झोपडपट्ट्यांवर लक्ष ठेवण्यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिसांना विनंती केली असून या भागात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सहा जणांना तपासणीसाठी डॉ. नायडू रुग्णालयात हलविण्यात आले असून यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे.
झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली असून या वसाहतीमधील कष्टक-यांसमोर आणखी एक चिंता वाढली आहे. आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ६५ वर्षीय वडील आणि ३० वर्षीय मुलीचा समावेश आहे. हे दोघेही ९ मार्च रोजी दुबईहून पुण्यात आलेले होते. यातील वडिलांना घशामध्ये त्रास जाणवू लागल्यानंतर दोघांनाही डॉ. नायडू रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांच्या वैद्यकीय चाचणीचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. या दोघांना लागण झाल्याचे समजताच वसाहतीमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दाट लोकवस्तीच्या या वस्तीमध्ये महापालिकेकडून फवारणी आणि अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वमहापालिकेने केलेल्या विनंतीनुसार पोलिसांनी या भागात बंदोबस्त लावला आहे. उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी या भागाला भेट देऊन पोलिसांना सूचना केल्या.