पुणे : अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदींनी घराच्या बालकनीत किंवा खिडक्यांमध्ये येऊन टाळ्या वाजविण्याचे किंवा एखादे भांड वाजविण्याचे आवाहन केले हाेते. देशभरात उत्स्फुर्त कर्फ्यु पाळल्यानंतर संध्याकाळी पाचनंतर माेठ्याप्रमाणावर नागरिक बाहेर पडले. अनेकांनी एकत्र येत फटाके देखील उडवले. त्यामुळे एकत्र येण्याच्या मुळ उद्देशाला हरताळ फासला गेला. त्यामुळे राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. असे असताना आज पुण्यात अनेक नागरिक घराबाहेर पडल्याने पाेलीस आयुक्तांनी शहरात वाहतूक बंदीचा निर्णय घेतला.
आज दुपारी 3 नंतर रस्त्यावर कुठलेही वाहन घेऊन येता येणार नाही असे आदेश पुण्याचे पाेलीस आयुक्त डाॅ. के व्यंकटेशम यांनी दिले. त्यानंतर दुपारी 3 नंतर पाेलिसांनी रस्त्यांवर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. जे नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळले त्यांना पाेलिसांनी चांगलाच चाेप दिला. यात तरुणांची संख्या अधिक हाेती. काेराेनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळाेवेळी केले हाेते. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने अखेर आज पुणे पाेलिसांनी कठाेर पाऊले उचलली.
दुपारी तीननंतर विविध ठिकाणी नाकाबंदी करुन पाेलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. त्यात सर्वच वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान 31 मार्चपर्यंत ही वाहतूक बंदी शहरात लागू करण्यात आली असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.