पुणे : ते दोघेही अंध, पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती, तिची प्रसुतीची तारीख जवळ येत चाललेली़ असे असताना लातूरहून सासूना पुण्यात सुनेच्या देखभालीसाठी यायचे होते. पण कोणतेही साधन नव्हते. अशा वेळी पोलीस धावून आले़ पुण्यात सुट्टीवरुन हजर होण्यासाठी येणार्या पोलीस नाईक दाऊद सय्यद यांनी त्यांना पुण्यात आपल्या सोबत आणले.
याबाबतची माहिती अशी, विश्वनाथ भिमराव नवले (वय ३३) व त्यांची पत्नी सपना नवले (रा. नळस्टॉप, एरंडवणे) हे दोघेही अंध असून बँकेत कामाला आहेत. सपना नवले या सध्या ९ महिन्यांच्या गर्भवती आहेत. त्यांच्या प्रसूतीची तारीख जवळ आली आहे. ते दोघेही अंध असल्याने या स्थितीत त्यांची काळजी घेणारे जवळचे कोणी नाही. त्यांची सासू पद्मावती जयराम तांदळे यांना लातूरहून पुण्यात बोलवायचे होते. परंतु संचारबंदी लागू झाल्याने त्यांना इकडे येणे शक्य होत नव्हते. पोलिसांची परवानगी मिळाली तरी येण्यासाठी कोणतेही वाहन नव्हते. त्यांनी पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांच्याशी संपर्क साधून अडचण सांगितली.
पोलिसांकडून काही व्यवस्था होईल का याची विचारणा केली. तेव्हा पोलीस दलात चौकशी केल्यावर युनिट २ कडील पोलीस नाईक दाऊद सय्यद हे अर्जित रजेवर त्यांच्या लातूर जिल्ह्यातील मुळ गावी जळकोट येथे गेले होते. ते रजेवरुन हजर होण्याकरीता ३ एप्रिलला पुण्याला येणार होते. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सय्यद यांना पद्मावती तांदळे यांना घेऊन येण्यास कळविले. त्याप्रमाणे सय्यद हे काल त्यांना लातूरहून घेऊन निघाले. शनिवारी त्यांना पुण्यात विश्वनाथ नवले यांच्या कर्वेनगर येथील घरी पोहचवले. त्यामुळे अशा परिस्थितीत पत्नीची चिंता दूर झाली आहे.
पोलिसांचे गेल्या काही काळातील नागरिकांना मारहाण करतानाचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत होते. आजच्या या मदतीमुळे पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन घडले आहे.