पुणे : लाॅकडाऊननंतर वारंवार विनंती करुन देखील अनेकजण उगाचाच बाहेर फिरत असल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे पाेलिसांची डाेकेदुखी वाढताना दिसत आहे. काही लाेक खाेटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे अशांवर आता पुणे पाेलिसांकडून कठाेर कारवाई करण्यात येत आहे. पाेलीस नागरिकांना त्यांचे बाहेर पडण्याचे कारण विचारत असून ते कारण न पटल्यास थेट जागेवरच नाेटीस देण्यात येत आहे. तर काहीजणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
काेराेनाने संपूर्ण जगाला वेठीस धरलेलं असताना देशात देखील काेराेनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी लाॅकडाऊनची घाेषणा केली हाेती. पाेलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करुन विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अनेकजण भाजी आणण्यासाठी चालले असल्याचे सांगत आहे तर काहीजण देवदर्शनासाठी बाहेर पडल्याचे कारण देतात. त्यामुळे बाहेर पडण्याचे कारण न पटल्यास पाेलीस त्यांच्यावर कारवाई करत आहेत. प्रसंगी त्यांना नाेटीसही दिली जात आहे.
शुक्रवारी पुणे शहरातील विविध भागांमध्ये माेठी रहदारी पाहायला मिळाली. यात भाजीपाला घेण्यासाठी तसेच सिलेंडर घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक हाेती. त्याचबराेबर विनाकारण बाहेर फिरणारे देखील त्यात हाेते. त्यांना अडवून पाेलिसांनी त्यांना नाेटीस दिली. विश्रामबागचे पाेलीस उपनिरीक्षक शक्तीसिंग खानविलकर म्हणाले, आज जे विनाकारण बाहेर फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई करत आहाेत. जे भाजी घेण्यासाठी किंवा सिलेंडर घेण्यासाठी जात आहेत त्यांना आम्ही साेडले आहे परंतु जे विनाकारण फिरत आहेत, त्यांची चाैकशी करुन त्यांना नाेटीस दिली आहे. त्याचबराेबर अनेकांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत.