पुणे : महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण महिन्याभराचा किराणा सामान भरण्याची वर्षानुवर्षाची सवय असलेल्या नागरिकांना लॉक डाऊनमुळे वस्तूचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचा गैर फायदा घेऊन भरमसाट दराने किराणा माल विकणार्या किरकोळ व्यापार्यांवर गुन्हे शाखा व अन्न धान्य वितरण विभागाच्या पथकांनी धडक कारवाई सुरु केली आहे. शहरातील विविध भागात चढ्या दराने किराणा विकणार्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
अन्न धान्य विभाग व पोलिसांना बाजार समितीकडून सध्या असलेल्या किराणा मालांच्या दरांची यादी मिळाली. त्यापेक्षा दीड पट ते दुप्पट भावाने विक्री केली जात असल्याचे शहरात दिसून येत आहे. अशा दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिले आहेत. बाणेर येथील पंचरत्न सुपर मार्केट मध्ये जादा दराने विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे कारवाई केली. दुकानदार पन्नाराम पुनाजी चौधरी (वय ४३, रा. बालेवाडी) याच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दुकानात शेंगदाणे १८० रुपये किलो, तुरडाळ १६०, मुगडाळ १५५, चना डाळ १४०, खोबरे २८०, शाबुदाणा १३५, साखर ४८ रुपये किलो भावाने विकली जात होती.
खडकी बाजार येथील बी एम अगरवाल किराणा जनरल स्टोअर्स येथील दुकानात शेंगदाळे १४०, गोटा खोबरे २२० रुपये किलो भावाने विकले जात असल्याचे आढळून आले. खडकी पोलिसांनी गौरव राजेंद्र अगरवाल (वय २८, रा. नवा बाजार, खडकी) यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच जादा दराने गॅस सिलेंडरची विक्री करणार्यांवरही पोलिसांचा वॉच असणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने दैनंदिन ठरवून दिलेल्या जीवनाश्यक वस्तुंच्या किंमतीपेक्षा चढ्या दराने विक्री करुन सामान्य जनतेकडून पैसे उकळणार्या दुकानदार, व्यापार्यांविरुद्ध यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिला आहे.