निलेश राऊत-पुणे : हातावरचे पोट असलेले कामगार, घरकाम करणारा महिला वर्ग, रिक्षाचालक यांच्यासह हजारो कष्टकरी वर्ग कोथरूडमध्ये ज्या झोपडपट्टी भागात राहतो. त्या केळेवाडी, मेगासिटी, वसंतनगर, हनुमाननगर, राऊतवाडी, जयभवानीनगर, इंदिरा पार्क, राजीव गांधी पार्क, म्हातोबा नगर, सुतारदरा या भागातील जनमाणसांच्या इच्छाशक्तीपुढे जगात हाहाकार उडवून देणारा कोरोना विषाणूही पराभूत झाला आहे. स्वच्छता व नागकिरांच्या स्वयंशिस्तीपुढे कोथरूडमधील हा सर्व झोपडपट्टी परिसर ग्रीन झोन (कोरोनामुक्त) ठरला आहे. कोरोनाची चाहूल लागल्यापासून किंबहुना लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून एकीकडे शहरातील अन्य झोपडपट्ट्यांमध्ये एका मागोमाग एक असे रूग्ण आढळून येऊ लागले. शहरातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांपैकी सुमारे ९० टक्के रूग्ण झोपडपट्टयांमध्ये आढळून आले असताना, कोथरूडमधील या सर्व झोपडपट्ट्यांमध्ये मात्र कोरोना शिरकाव करू शकलेला नाही. केळेवाडी, वसंतनगर आदी झोपडपट्ट्यांचा सर्व्हे क्रमांक ४४ मधील साधारणत: ९० एकर परिसर व जवळच असलेल्या जयभवानी, सुतारदरा आदी भागातील साधारणत: १२० एकर परिसरातील सुमारे ५५ हजार नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कोरोना दूर ठेवण्यास यश मिळविले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने, २३ मार्चला देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाली. तत्पूर्वीच या भागात स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठी जनजागृती करण्याचे काम हाती घेतले. लॉकडाऊन झाल्यावर पोलीस यंत्रणेने या परिसरातील चौक, गल्ली-बोळ, हम रस्ते बॅरिकेटस् व लाकडी कपांऊड टाकून वाहतुकीस बंद केले. परंतू, तत्पूर्वीच या भागातील हातावरचे पोट असलेल्या विशेषत: घरकाम करणाऱ्या महिला वर्ग, मजूर वर्ग व ज्यांच्याकडे रेशनकार्डही नाही अशांची माहिती संकलित करून, त्यांना दोन वेळचे जेवण घरपोच देण्याची व्यवस्था केली गेली. १० मे पर्यंत या अडीच हजार नागरिकांचा दोन वेळचे जेवण दिवा प्रतिष्ठान व भोलेनाथ मित्र मंडळाच्यावतीने दिले गेले. यामुळे रोजगार गेला तरी पोटाची खळगी भरल्याने हे नागरिक परिसराबाहेर पडले नाही. दरम्यान, स्थानिक कार्यकर्ते दिलीप कानडे, निलेश शिंदे, विजय बाबर, भाऊ काळे आदींनी येथील ३०० हून अधिक रिक्षा चालकांना त्यांचा व्यवसाय बंद झाल्याने, पुढील महिनाभर पुरेल एवढे धान्य पोहोच केले. तसेच रेशनिंग ज्यांना मिळणार नाही अशा ५ हजार कुटुंबांनाही धान्य पुरवठा करण्यात आला. भाजीपाल्याची सोय झोपडपट्ट्यांमधील मोकळ्या जागेत करून देण्यात आली. यामुळे सर्व गरजा पूर्ण झाल्याने या लॉकडाऊनच्या काळात येथील नागरिक बाहेर पडले नाहीत. तसेच आपल्याकडेही या कठीण प्रसंगी बाहेरील नोतवाईक किंवा पाहुणाही येऊ दिला नाही. याच काळात प्रत्येक भागात कार्यकर्त्यांचे गट तयार करून, नागरिकांमध्ये कोरोनाच्या संसर्गाविषयी मोठी जनजागृती प्रशासकीय सहकार्याने करण्यात आली. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. आरोग्य तपासणीत सर्दी, ताप, खोकला व तत्सम लक्षणे आढळल्यास लागलीच त्याच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी नागरिकांनीही कोणतीही माहिती न लपविता आरोग्य अधिकाºयांना सहकार्य केले. कोथरूडमधील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना शिरकाव करू शकला नाही याला मूळ कारण येथील नागरिकांची कोरोनावर मात करण्याची इच्छाशक्तीच ठरू शकली व शहराच्या मध्यवर्ती भागातील झोपडपट्टयांमध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाला ते रोखू शकले. -----------------स्वच्छतेवर दिला भर कोथरूडमधील या झोपडपट्टी भागात ७० टक्के घरांमध्ये शौचालय आहेत़ तर जी सार्वजनिक शौचालये आहेत, ती दिवसातून ५ वेळा स्वच्छ करण्यात येत आहेत. याकरिता पालिकेच्या यंत्रणेची वाट न पाहताच स्थानिक कार्यकर्ते यासाठी पुढे आले. परिणामी येथील प्रत्येक सार्वजनिक शौचालय घरातील शौचालयाप्रमाणे स्वच्छ असून, शौचालयाबाहेर बेसिन बांधून सॅनिटायझरचीही सोय केली गेली. तसेच शौचालय परिसरासह संपूर्ण झोपडपट्टी परिसरात सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. -----------------आरोग्य शिबिरासह रेशनिंग घेतेवेळी झाली तपासणी झोपडपट्टयांमधील रेशनिंग दुकानदारांना एकत्र करून मोरे विद्यालयात सर्व रेशनिंगचे धान्य उतरून घेण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांच्या मदतीतून दुकानदारांनी एकीकडे धान्य वाटप सुरू केले. तर दुसरीकडे येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. साधा ताप जरी असला तरी त्याला लागलीच मोफत औषधे पुरविण्यात आली. या यंत्रणेनेव्दारे सुमारे ६ हजार नागरिकांची तपासणी या काळात करण्यात आली. ---------------------नागरिकांची साथच लाखमोलाची ठरली लॉकडाऊनच्या काळात या झोपडपट्टी भागातील नागरिकांनी पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनास उस्फुर्त प्रतिसाद दिला. दिलेल्या सूचनांचे पालन केले़ प्रशासनाला स्थानिक लोकप्रतिनिधीं व कार्यकर्त्यांनीही मोठे सहकार्य केले. जनजागृती व कोरोनावर मात करण्याचा निर्धार यामुळे या परिसरात एकासही कोरोनाची लागण झाली नाही. अशा भावना पोलीस निरिक्षक प्रतिभा जोशी व वार्ड ऑफिसर संदीप कदम यांनी 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केली. ---------------नागरिकांचे सहकार्य व कार्यकर्त्यांच्या बळावरच हे शक्य - मानकर कोथरूडमधील झोपडपट्टीमध्ये कोरोना शिरकाव करू शकला नाही याचे सर्व श्रेय हे स्थानिक नागरिकांचे असून, कार्यकर्त्यांच्या बळावर व प्रशासनाच्या सहकार्याने हा भाग कोरोनामुक्त ठेवण्यास यश आले असल्याचे स्थानिक नगरसेवक दिपक मानकर यांनी सांगितले.
CoronaVirus Positive News : जनमाणसांच्या इच्छाशक्तीपुढे पुण्यातील 'या' भागात‘कोरोना’ झाला पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 1:04 PM
स्वच्छता व स्वयंशिस्तीमुळे कोथरूडमधील झोपडपट्टयाही ठरल्या ग्रीन झोन,एकही नाही कोरोनाबाधित
ठळक मुद्देनागरिकांचे सहकार्य व कार्यकर्त्यांच्या बळावरच हे शक्यआरोग्य शिबिरासह रेशनिंग घेतेवेळी झाली तपासणी