पुणे : जमावबंदी असल्यामुळे रुग्णवाहिकांच्या स्वच्छतेसह निर्जंतुकीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने ही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पुणे जिल्हा एम्ब्युलन्स असोसिएशनच्यावतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करण्यात आली. हेल्प रायडर्स यांच्यावतीने असोसिएशनच्या सदस्यांची महापौरांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. रुग्णवाहिकांच्या सुरक्षेकरिता त्यांना एन 95 मास्क, सॅनिटायझर, हातमोजे पालिकेने उपलब्ध करून देण्यात यावेत अशीही मागणी करण्यात आली. काही नागरिकांकडून परगावी जाण्याकरिता रुग्णवाहिकांचा गैरवापर प्रयत्न केला जात आहे. सर्व वाॅशिंग सेंटर बंद असल्यामुळे रुग्णवाहिका निर्जंतुक करताना अडचणी येत आहेत. तसेच मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह प्लास्टिकमध्ये व्यवस्थित बांधून देणे आवश्यक आहे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
महापौरांनी रुग्णवाहिका सफाई आणि निर्जंतुकीकरणासाठी शहरात ३/४ ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पालिका आयुक्तांना याबाबत पत्र दिल्यावर त्यांनीही व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे मान्य केल्याने महत्वाचा प्रश्न मार्गी लागल्याचे मुख्य समन्वयक प्रशांत कनोजिया यांनी सांगितले. यावेळी मनसेचे पालिकेचे गटनेते वसंत मोरे, असोशिएशनचे ईम्पीलीग भद्रे, गोपाळ जांबे, अंकुश गुळवणी, शरद करंजकर आदी उपस्थित होते.