पुणे : पुणे महापालिकेला चार दिवस झाले तरी रेमडेसिविर मिळत नसल्याचा दावा महापौर मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केली आहे. महापालिकेला थेट विकत घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने शहरातील विविध भागात हॉस्पिटल सुरू केलेली आहेत. या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना आवश्यक असलेली रेमडेसिविर इंजेक्शन गेले चार दिवस मिळत नसल्याची तक्रार महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. थेट कंपनीकडून खरेदी करण्याची परवानगी पालिकेला द्यावी. तसेच ही खरेदी होईपर्यंत राज्य सरकारकडून मिळणारा रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेसा साठा पालिकेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
शहरात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाधितांना आवश्यक ते उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. सद्यस्थितीत शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलसह अन्य सहा हॉस्पिटलमध्ये १६९० कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. यातील व्हेंटिलेटर तसेच अतिदक्षता विभागातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासते. पालिकेला दररोज एक हजार इंजेक्शनची आवश्यकता असते.
पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळावे यासाठी पालिकेने हे इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपनीला वर्क ऑर्डर देऊन खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे. सिप्ला, मायलेन यासह मोठ्या वितरकांना देखील पालिकेने संपर्क करून हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र हे इंजेक्शन केवळ राज्य सरकारला आणि जिल्हाधिकारी यांनाच उपलब्ध करून देण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे असल्याने हे इंजेक्शन पालिकेला देण्यास संबधित कंपन्यांनी असमर्थता दाखविली आहे.
पालिकेच्या दळवी, नायडू, मुरलीधर लायगुडे, खेडेकर हॉस्पिटल बोपोडी, बाणेर येथील डीसीएचसी हॉस्पिटल, ईएसआय हॉस्पिटल बिबवेवाडी या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. पालिकेला आवश्यक असलेली ही इंजेक्शनची गरज भागविण्यासाठी पालिकेला तातडीने ही इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश संबधित कंपन्यांना द्यावेत. तसेच पालिकेची खरेदी पूर्ण होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा पुरेसा कोटा पालिकेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बिडकर यांनी केली.