Coronavirus Pune : ससून मधले बेड वाढणार नाहीतच. डॉक्टरांच्या संपाच्या भूमिकेमुळे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 08:11 PM2021-04-16T20:11:25+5:302021-04-16T20:12:12+5:30
ससूनच्या निवासी डॉक्टरांनी जर प्रशासनाने बेड्स वाढवले तर संपावर जाण्याची भूमिका घेतली होती।
पुणे : ससून रुग्णालयातील बेड अखेर वाढणार नसल्याचंच स्पष्ट झालं आहे. डॅाक्टरांच्या संपामुळे सोमवारपर्यंत बेड वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता ससुन मधले बेड वाढवले जावेत अशी मागणी पुढे येत होती. जवळपास तीनशे नव्या बेड्स वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण रुग्णालयात एका बेडवर दोन पेशंट असताना आता मात्र बेड वाढणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ससुनच्या डॅाक्टरांनी घेतलेल्या भुमिकेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले, ससूनमध्ये मागच्या वेळेसपेक्षा दुप्पट बेड कोरोना रुग्णांसाठी वापरात आहे. नेहमीच तिथे लोड येते. ग्रामीणमधला बरा न होणारा पेशंट ससूनला येतो. ससूनला आधीच खूप बेड वाढवले आहेत.त्यामुळे सध्या तेथील कोरोना बेड्सची संख्या वाढविण्यात येणार नाही.
पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
तसेच ससूनच्या निवासी डॉक्टरांना सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. तुमचे रास्त मुद्दे नक्की ऐकून घेऊ, पण तुम्ही जर ऐकलं नाही तर काही कडक पावलं उचलावी लागतील असा सज्जड इशारा देखील दिला आहे.
पवार म्हणाले,ससूनमधील निवासी डॉक्टरांनी परिस्थितीची भान ठेवून टोकाची भूमिका न घेता सहकार्य करण्याची मानसिकता ठेवावी. तसेच कोण पक्ष काय म्हणतो याला महत्व नसतं. तर शहराच्या हिताचे काय हे पाहुन निर्णय घेतो.