आत्ता पर्यंत कोमोर्बिडीटी हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरत होते.पण आता मात्र ही परिस्थिती बदलताना दिसतेय . पुणे जिल्ह्यातील एकूण मृत्यूपैकी २० टक्के मृत्यू हे कोणताही आजार नसणाऱ्या माणसांचे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये देखील पुणे महापलिकेच्या क्षेत्रात मृत्यू चे प्रमाण जास्त असल्याचे दिसत आहे. हे प्रमाण इतके का अशी विचारणा केंद्रीय पथकाने केली आहे.
दरम्यान तज्ञ डॉक्टरांचा मते काही तरुणांमध्ये व्हायरल लोड जास्त होऊन ते पहिल्या काही दिवसांतच गंभीर होतात. अशा लोकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये दररोज जवळपास १० हजार रुग्ण सापडत आहेत.एकीकडे रुग्ण संख्या वाढत असतानाच मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचे प्रमाण देखील वाढत आहे. या मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांचा मृत्यू चे ॲनलिसिस जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. यामध्ये पुणे महापालिका हद्दीत झालेल्या मृत्यू पैकी ४२८० मृत्यू हे काही ना काही आजार असलेल्या लोकांचे झाले आहेत.तर १४१५ लोक म्हणजे २४.८ टक्के हे कोणताही आजार नसलेले नागरिक आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये १८३२ म्हणजे ८६.९ टक्के मृत्यू हे कमॉर्बीडीटी असलेल्या नागरिकांचे आहेत तर २७५ रुग्ण म्हणजे १३.१ टक्के लोक हे कोणताही आजार नसतानाही मृत्युमखी पडले आहेत. एकूण जिल्ह्यात २०.३ टक्के मृत्यू हे कोणताही आजार नसणाऱ्या नागरिकांचे होत आहेत.
ज्यांना वाचवणं शक्य होतं अशा नागरिकांचे मृत्यू नेमके कशामुळे होत आहे? काही दुर्लक्ष होत आहे का असा सवाल या केंद्र सरकारचा प्रतिनिधींनी प्रशासनाला विचारला आहे.
यामागची नेमकी कारणे काय याबाबत बोलताना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर धनंजय केळकर म्हणाले ,"दोन प्रकारचे रुग्ण आहेत. ज्यांना कोमोर्बिडीटी आहे ते रुग्ण आहेत त्यांची तब्येत हळू हळू खालावत जाते. तर काही आजार नसलेले अनेक जण थेट दोन ते तीन दिवसात गंभीर होऊन येत असल्याचे ही पाहायला मिळत आहे. याचे एक कारण हे त्यांचा निष्काळजीपणा म्हणजे मास्क न परिधान करणे यामुळे व्हायरल लोड वाढून हे होत असावं असा अंदाज आहे. व्हायरल लोड हे प्रमुख कारण असू शकतं."