पुणे : शहरात अद्यापही गरजू कोरोना बाधित रुग्णांना रेमिडिसिव्हीर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच या इंजेक्शनचा काळा बाजार शहरात सुरू असल्याचा देखील आरोप केले जात आहे.या सर्व पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी रेमिडिसीव्हीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईंकांकडून मोठी गर्दी केली जात आहे. मात्र,आता रेमिडिसीव्हीर इंजेक्शनच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. . उद्यापासून हे इंजेक्शन रुग्णांना संबंधित कोविड सेंटर किंवा रुग्णालयातच मिळणार आहे असे स्पष्ट आदेश अन्न व औषध पुरवठा विभागाने दिले आहेत.
पुणे शहरात सध्या विविध ठिकठिकाणी रेमडिसिव्हीर या इंजेक्शनसाठी मोठी गर्दी केली जात आहे. मात्र, केमिस्ट असोसिएशनला मिळालेल्या आदेशानुसार, उद्यापासून हे इंजेक्शन रुग्णांना संबंधित कोविड सेंटर किंवा रुग्णालयात मिळणार आहे. आजच्या दिवस केमिस्ट असोसिएशनने आधी टोकन कूपन दिलेल्या नागरिकांनाच ते दिले जाणार आहे. यामुळे रेमिडिसिव्हीर इंजेक्शनवरून नागरिकांमध्ये प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
आपल्या कोरोनाबाधित नातेवाईकांना रेमिडिसीव्हिर इंजेक्शन मिळावे या हेतूने अनेक ठिकाणी नागरिक सात आठ तासांपासून रांगेत उभे आहेत. तसेच अनेक जणांनी शहरातील, सह्याद्री, कृष्णा, पुना, दीनानाथ मंगेशकर यांसारख्या विविध रुग्णालयाचे उंबरठे झिजवले असून त्या ठिकाणी निराशाच पदरी पडली आहे.यामुळे हे नातेवाईक रेमिडिसिव्हिरच्या उपलब्धतेसाठी तासनतास रांगेत उभे होते. मात्र, त्यांच्या चिंततेत भर पडली असून उद्यापासून फक्त कोविड सेंटर अथवा रुग्णालयातच हे इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. इतर कोठेही हे इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाईकांना दिले जाणार नाही असे स्पष्ट आदेश अन्न व औषध प्रशासन पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे.
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमिडिसिव्हिर इंजेक्शनचा वापर केला जात आहे. मात्र त्या प्रमाणात हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. याचाच गैरफायदा घेत जादा दराने ह्या इंजेक्शनचा काळा बाजार सुरू आहे. तो रोखण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.
केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेनकर म्हणाले,गेल्या पाच सहा दिवसांपासून गरजू रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करत होतो.आतापर्यंत १७०० ते १८०० इंजेक्शन दिले आहे. अशा स्पष्ट सूचना अन्न व प्रशासन पुरवठा विभागाने आम्हाला दिल्या आहेत.त्यामुळे नागरिकांनी या इंजेक्शन उपलब्ध करून देणाऱ्या दुकानासमोर गर्दी करणे टाळावे. कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे.
रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु असलेल्या बहीण, आई, वडील,चुलते अशा आपल्या नातेवाईकांसाठी हे प्रत्येकजण गेल्या सात ते आठ तासांपेक्षा अधिक काळ रांगेत उभे आहे. त्यांच्या सर्वांच्या मनात आपल्याला रेमडिसिव्हीर हे इंजेक्शन मिळेल आणि त्यानंतर रुग्णालयात उपचार घेणारे नातेवाईक बरा होईल. अशी एकच भावना आहे.मात्र, आधीच रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असताना पुण्यात आणखी एकच भावना आहे की गोंधळ उडाला आहे.