पुणे : तुरळक अपवाद वगळता लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, शुक्रवार पेठ, रविवार पेठेतील सर्व बाजारपेठांनी मंगळवारी कडकडीत बंद पाळला. गुरुवारपर्यंत स्थिती सुधारल्यास शुक्रवारपासून दुकाने सुरू करण्यात येतील; अन्यथा बंद पुढे सुरूच ठेवण्यात येईल, असे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध ८२ संघटनांच्या प्रतिनिधींनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात चर्चा करून बंद वाढवायचा की स्थगित करायचा, याबाबत निर्णय घेण्यता येईल. ‘लग्नसराईमुळे सोने, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक दुकानांमधे गर्दी होत आहे.सध्याचा काळ नफा-नुकसान मोजण्याचा नाही. पुणेकर नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. व्यापाऱ्यांनी आवाहनाला प्रतिसाद देत दुकाने बंद केली आहेत. काही तुरळक ठिकाणी दुकाने सुरू आहेत. त्यांनाही सामाजिक भान राखत दुकान बंद करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे रांका म्हणाले.राज्यसेवा पूर्व परीक्षा ५ एप्रिललाच होणारपुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) येत्या ५ एप्रिल रोजी ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०’ घेण्याचे नियोजन केले असून या परीक्षेच्या वेळापत्रकात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे एमपीएससीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार येत्या ५ एप्रिलला (रविवारी) राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या आयोजनाची तयारी झालेली असल्याने योग्य ती दक्षता घेऊन पूर्व नियोजित वेळापत्राकानुसारच ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०’ घेतली जाणार आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.‘चितळें’ना नोटीसआपल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जबाबदार धरून आपणावर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी चितळेंच्या शांतीनगर कॉर्नर दुकानाला पाठविली.पुण्यात आणखी एक कोरोना रुग्णमंगळवारी अमेरिकेतून दुबईमार्गे मुंबईतून पिंपरी-चिंचवड येथे आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १७ वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनाबाधित देशांचे दौरे करून आलेल्या सर्व व्यक्तींना यापुढे २४ तास प्रशासनाच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाच्या अथवा घरामध्येच विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीने याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले.या कोरोना बाधीत व्यक्तीने मुंबई ते पिंपरी चिंचवडदरम्यान केलेल्या प्रवासाच्या काळात व नंतरदेखील त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा जिल्हा प्रशासनाकडून शोध घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले. गेल्या २४ तासांत एकूण १८ नवीन संशयित व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.
Coronavirus : पुण्यातील बाजारपेठा कडकडीत बंद, कोरोनामुळे रस्ते पडले ओस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 6:26 AM