पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सरकारी रुग्णालयात बेड्सचा मोठा तुटवडा जाणवत आहे. काही जणांना तर वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी दोन हजारांवर आलेली सक्रिय रुग्णसंख्या लाखांवर जाऊन पोहचली आहे. मात्र, ससून रुग्णालयातील रुग्णांची बेड्स अभावी होणारी हेळसांड आणि भयावह वास्तव परिस्थिती दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या चिंताजनक परिस्थितीची जाणीव करून देणारी आहे. महापालिका आणि आरोग्य यंत्रणा सर्व पातळीवर कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. मात्र तरीदेखील कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.या परिस्थितीत प्रशासन यंत्रणेसमोर कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड्स उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे त्यात मुंबई पुणे मुंबई नागपूर अशा शहरांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे महाराष्ट्रातच नाही तर देशांमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहे. ससून रुग्णालयासह सध्या शहरातल्या जवळपास सर्व रूग्णालयातील बेड भरले आहे. शहरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची मोठी कमतरता निर्माण झाली आहे.
त्यातच गरिबांसाठी वरदान असलेल्या ससून रुग्णालयाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.ज्यात एका बेडवर दोन किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण उपचार घेताना दिसतात. इतकच नाही तर जमिनीवर बसून सुद्धा काहीजण उपचार घेत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा वरील ताण आणि भीषण परिस्थिती स्पष्ट होत आहे.
पुण्यातील कोरोना रुग्ण वाढत असताना प्रशासन यंत्रणा ससून रुग्णालयातील बेड्स वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र त्यासोबत मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन,वैद्यकीय उपचार यंत्रणा, कर्मचारी वर्ग न देता फक्त जनतेला दाखविण्यासाठी हा निर्णय घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने आमच्या मागण्यांचा विचार करत उद्या सकाळी ९ पर्यंत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर शनिवारपासून काम बंद करत संपावर जाण्याचा इशारा ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या 'मार्ड' ने दिला आहे.