पुणे : कोरोनाचा संसर्ग शहरात वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांची उपचारासाठी बेड मिळविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच काही खासगी रुग्णालयाकडून या परिस्थितीचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा लूट सुरु आहे. अशा पद्धतीने पैसे उकळणाऱ्या काही खासगी दवाखान्यांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे. आणि ही किरकोळ स्वरूपाची कारवाई न करता मोठी असावी जेणेकरून इतर रुग्णालयांवर वचक बसेल, अशी मागणी पुणे महानगर पालिकेच्या भाजप नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
पुणे शहरात कोरोना थैमान घालत असताना आरोग्य व्यवस्था कोलमडत चालली आहे. रुग्णांना बेड्स, उपचार वेळेवर मिळत नसल्याने अनेकांनी जीव देखील गमावला आहे. त्यामुळे कोविड रुग्ण प्रामुख्याने खासगी हॉस्पिटल्समध्ये जिथे जागा मिळेल तिथे भरती होत आहेत. रुग्णांच्या या अगतिकतेचा फायदा काही खासगी दवाखाने उचलत असून, मनमानी कारभार करून ज्यादाचे पैसे रुग्णांकडून उकळत आहेत. सर्व सरकारी आदेश पायदळी तुडवून ज्यादा दर संबंधित काही दवाखाने आकारत आहेत. याच धर्तीवर नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याची मागणी पुणे मनपा आरोग्यप्रमुखांना केली.
नागपुरे म्हणाल्या, राज्य सरकारने कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या खासगी दवाखान्यांसाठी नियमावली तयार केली आहे. त्यात कोरोना उपचारासंबंधी ठराविक दर निश्चित केले आहे. तरीदेखील कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रचंड आर्थिक पिळवणूक सुरु आहे. याविषयी त्यांनी घटनांचा दाखला देखील यावेळी दिला आहे. सिंहगड रस्त्यावरील एका भंडारी मॅटर्निटी अँड नर्सिंग होमने शासनाचे आदेश डावलून स्वत:च्या दरपत्रकानुसार बिल आकारले आहे.तसेच रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णाला किमान ५ दिवस रुग्णालयात ठेवावे लागते. परंतु, भंडारी हॉस्पिटलने रुग्णांना फक्त ३ दिवस रुग्णालयात उपचार देवून घरी सोडले आणि ६० हजार बिल आकारले.आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या टेस्ट आणि औषधांचा समावेश नव्हता.