पुणे : पुण्यात ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने रुग्णालयातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. ऑक्सिजनचा साठा संपल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. प्रशासन यंत्रणेकडून ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. अद्याप तरी त्यांच्या प्रयत्नांना समाधानकारक यश आलेले नाही.त्यातच आता पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात असलेल्या माई मंगेशकर रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपण्याच्या मार्गावर असल्याने गंभीर रुग्णांना दुसरीकडे हलविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची आहे.
पुणे शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन साठा संपत आल्याने गंभीर रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून माई मंगेशकर रुग्णालयातील गंभीर रुग्णांना देखील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येत आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क केला असता गंभीर रुग्णांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येत असल्याची माहिती मिळाली. पण या रुग्णांचा अधिकृत आकडा उपलब्ध होऊ शकला नाही.
पुणे शहरातील कोरोना संकट भीषण होत असताना आता रुग्णालयात ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी टंचाई भासू लागली आहे. त्यात ॲाक्सिजनचा इतका गंभीर होत चालला असून अनेक रुग्णांना स्वतःचा जीव गमवावा लागत आहे. यातच आता शहरातील ४०-५० लहान रुग्णालयांनी ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांना दाखल करून घेणे थांबविले आहे. यामुळे आरोग्य सेवेत एकूणच गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून ॲाक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. तुटवड्या अभावी रुग्णालयांवर कोरोना रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची वेळ आली होती. पण अडचण असतानाही ऑक्सिजन मिळत नसल्याने आता शहरातील लहान रुग्णालयांनी कोरोनाचे रुग्ण दाखल करून घेणे थांबविले आहे. या रुग्णांना दुसऱ्या मोठ्या रुग्णालयांमध्ये जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
पुणे शहरातल्या १२० पैकी ४०-५० रुग्णालयांमध्ये अशी परिस्थिती आहे. "ऑक्सिजन अभावी रुग्ण मॅनेज करायला अडचण येत आहे. जर हॅास्पिटल मधून रुग्णाला शिफ्ट करायची वेळ आली तर नातेवाईकांकडून तोडफोड करण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे या छोट्या रुग्णालयांनी रुग्णांना भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांना मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला त्यांच्याकडून देण्यात आहे, असे पुण्यातील हॅास्पिटल बोर्ड ॲाफ इंडियाचे चेअरमन डॉ. संजय पाटील यांनी 'लोकमत'ला सांगितले.