पुणे : काेराेनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढताना दिसत आहे. दरराेज काेराेनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ हाेत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, जिम बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबराेबर धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव माेठ्याप्रमाणावर हाेऊ नये यासाठी पुण्यातील व्यापारी महासंघाने तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात 40 हजार व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे नेहमी गजबजलेली असणारी तुळशीबाग आज शांत दिसत हाेती.
राज्यात सर्वप्रथम पुण्यात काेराेनाबाधित रुग्ण आढळले. त्यानंतर राज्यभरात काेराेनाच्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. पुण्यात आत्तापर्यंत 16 जणांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले असून राज्यात हा आकडा 39 पर्यंत जाऊन पाेहचला आहे. या पार्श्वभूमिवर आता सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबई, नागपूर या शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून पुण्यात अंशतः जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी कामानिमित्त बाहेर पडू नये असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी केले आहे.
पुण्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहे. आज पासून तीन दिवस पुण्यातील व्यापारी महासंघाने आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील सर्व दुकाने आज बंद हाेती. तर गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या तुळशीबागेत आज शांतता पसरली हाेती. स्वाईन फ्लू नंतर पहिल्यांदाच तुळशीबाग बंद ठेवण्यात आली आहे. तुळशीबागेत आलेल्या स्वाती साेमण म्हणाल्या, पहिल्यांदाच तुळशीबाग बंद असल्याचे पाहिले. तुळशीबाग बंद हाेईल असे कधी वाटले नव्हते.