प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : पुणे : इस्राएल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रीसर्चने कोरोना विषाणूला मारक ठरणाऱ्या मोनोक्लोनल अँटिबॉडी तयार केल्याचा दावा केला आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीचा वापर याआधी जगभरात कॅन्सरच्या उपचारांमध्ये यशस्वी ठरला आहे. याशिवाय, इस्राएल विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अतिशय प्रगत देश असल्याने हा दावा कोरोनाच्या महामारीत आशेचा किरण मानला जात आहे. मात्र, कोरोना महामारीच्या काळात विविध दावे होत असल्याने संपूर्ण अभ्यास आणि संशोधन झाल्याशिवाय त्याबाबत मत ठरविणे योग्य होणार नाही, असे मत भारतातील वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
इस्राएल इन्स्टिट्यूट आॅफ बायोलॉजिकल रीसर्चने मोनोक्लोनल अँटिबॉडी तयार केल्याचा दावा संरक्षणमंत्री नफ्ताली बेनेट यांनी केला आहे. सध्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध देशांवर विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. थेरपी, लशीचा शोध, औषध याबाबत गेल्या दोन महिन्यांत जगभरातून विविध दावे करण्यात आले आहेत. मात्र, मानवी चाचणीत यश मिळाल्याशिवाय कोणताही दावा ग्राह्य धरून कोरोना नियंत्रणात येईल असे निश्चितपणे सांगता येणार नाहीे, असे निरीक्षण नोंदविले जात आहे. दुसरीकडे, इस्राएलमधील प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान पाहता, अँटिबॉडीचा हा दावा सप्रमाण सिद्ध झाल्यास आशेचा किरण म्हणून त्याकडे पाहता येऊ शकते, अशीही चर्चा आहे.
याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘मोनोक्लोनल अँटिबॉडी ही पद्धत कॅन्सरच्या उपचारांमध्ये केमोथेरपीला पर्याय म्हणून वापरली जाते. शरीरात कोणत्याही रोगजंतूने अथवा विषाणूने शिरकाव केल्यास त्याविरुद्ध लढण्यासाठी शरीरात अँटिबॉडी तयार होतात. अँटिबॉडीतील अणू आणि रेणू समान स्वरूपाचे असतात. केमोथेरपीमध्ये कॅन्सरच्या पेशींबरोबरच आजूबाजूच्या चांगल्या पेशीही मारल्या जातात. मोनोक्लोनल अँटिबॉडीद्वारे विशिष्ट पेशींवरच हल्ला केला जातो. या उपचारपद्धतीबाबत जगभरात संशोधन सुरू आहे. कोरोना विषाणूच्या आरएनएमधील घटक नष्ट करू शकणाºया समान स्वरूपाच्या अँटिबॉडी तयार केल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. मात्र, याबाबत अधिकाधिक अभ्यास होणे गरजेचे आहे. सखोल संशोधन, क्लिनिकल ट्रायल यानंतरच कोणत्याही चाचणीला मान्यता मिळू शकते.’’
इस्राएलमधील वैद्यकीय तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. लेझर किरणांच्या उपचारांचा लाभ इस्राएलमुळेच संपूर्ण जगाला झाला. लेझर थेरपीचे सर्व प्रमुख संशोधन इस्राएलमध्ये झाले. अमेरिकेपेक्षाही अधिक प्रभावी पद्धतीने या देशाने लेजर तंत्रज्ञानात काम केले. त्यामुळे कोरोनाबाबतचे अँटिबॉडी संशोधन स्वागतार्ह मानले पाहिजे. मात्र, हा उपाय खूप खर्चिक असू शकतो आणि त्याच्या यशस्वी चाचणीसाठी वाट पाहावी लागेल.शरीरात एखादा परका पदार्थ प्रवेश करतो तेव्हा त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी अँटिबॉडी तयार करणाºया पेशी तयार होतात. मोनोक्लोनल अँटिबॉडी म्हणजे एकाच मूळ पेशीपासून तयार झालेल्या एकसारख्या स्वरूपाच्या पेशी आणि त्यांनी तयार केलेल्या अँटिबॉडी रासायनिकदृष्ट्या समान स्वरूपाच्या असतात. समान स्वरूप असल्याने या अँटिबॉडी विशिष्ट लक्ष्यावर एकत्रित हल्ला करतात आणि अँटिजेन निष्प्रभ करतात. काही स्वरूपाच्या कॅन्सरमध्ये या स्वरूपाचे उपचार यशस्वी झाले आहेत. कोरोना विषाणूचे प्रोटीन मोनोक्लोनल अँटिबॉडीनी नष्ट केले तर हे उपचार कोरोनामध्ये प्रभावी ठरू शकतात. मात्र, चाचण्या यशस्वी ठरल्याशिवाय कोणतेही उपचार कितपत यशस्वी ठरू शकतात, यावर भाष्य करणे अवघड आहे. इस्राईल देश छोटा असला तरी वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या बाबतीत त्यांचे काम मोठे आहे. सिद्धतेच्या अनेक कसोट्या पार केल्यानंतर मोनोक्लोनल अँटिबॉडीबाबतचे यश सिद्ध होऊ शकेल. - डॉ. मंदार परांजपे, एमडी, पॅथॉलॉजिस्ट