पुणे : दिल्ली येथील निजामुद्दीनच्या तब्लिकी जमात मरकजमध्ये गेलेल्या पुणे शहरातील ९२ जणांपैकी ४६ जणांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले असून या सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४२ जणांचे नमुने निगेटीव्ह आले असून उर्वरीत चार जणांचे अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे आहेत.
यासोबतच आणखी ४६ जणांचा शोध सुरु असून अनेकांनी मोबाईल बंद करुन ठेवल्याचे समोर आले आहे. निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्याला गेलेल्या पुणे जिल्ह्यातील 1३६ जणांची यादी प्रशासनाला मिळाली आहे. त्यातील बहुतांश लोक पुणे शहरातील आहेत.
पुणे शहरातील ९२ जणांनी जमात मरकजमध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी ४६ जणांचा शोध सुरु आहे. काही जणांनी मोबाईल सिमकार्ड बदलले आहे, तर काही जणांनी राहण्याची जागाच बदलल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाला त्यांचा शोध घेणे अवघड होत आहे. दरम्यान, शोध घेण्यात आलेल्या ४६ जणांना क्वॉरंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यातील ४२ जणांच्या चाचणीचे अहवाल हे निगेटीव्ह आलेले असून उर्वरीत चौघांचे चाचणी अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. तुर्तास तरी सापडलेल्या लोकांपैकी ४२ लोकांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने काळजी काही प्रमाणात कमी झाली आहे --