बारामती : राज्यात 'कोरोना' बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, आपल्या बारामतीत ही एक रुग्ण सापडला आहे. त्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. संकट आपल्या दारात आले असताना आपण घाबरून न जाता या परिस्थितीचा संयमाने मुकाबला करावा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. कोणीही घरा बाहेर न पडता एकसंघता आणि संयमाच्या 'बारामती पॅटर्न'चा राज्यासमोर आदर्श घालून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.
'कोरोना'चे संकट संपूर्ण जगावर घोंगावत आहे. आपल्या राज्यातही आलेले हे संकट आता आपल्या दारात आले आहे. बारामतीतील काही परिसर सील करण्यात आला आहे, तसेच तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार अत्यंत खंबीर पावले उचलत आहे. या संकटाचा विस्तार होऊ नये म्हणून आपण 'लॉकडाऊन'चा पर्याय निवडला आहे. या संकटाला आपल्याला याच टप्प्यावर रोखायचे आहे. त्यासाठी कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपल्या बारामतीच्या पॅटर्नचा देशभारत लौकीक आहे, या लौकिकाला साजेसच या संकटाला आपण तोंड देऊया. या संकटाचा सामना करण्यासाठी आपण सक्षम आहोत, मात्र या परिस्थितीत कोणत्याही अफवेला बळी पडू नका. नेहमी प्रमाणे एकसंघपणे या संकटाचा मुकाबला करू या. राज्य सरकार आणि प्रशासनाने केलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे....घरातच रहा , सुरक्षित रहा -खासदार सुळे बारामती शहरात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळून आला आहे. त्याच्यावर उपचार सुरु केले आहेत. नागरिकांना नम्र विनंती आहे की कृपया कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाकडून येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.नागरिकांनी आपल्या घरातच थांबून या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करावी.शहरातील काही भागांतील वाहतूक कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वळविण्यात आली असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आपण सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.सर्वजण घरातच राहा,सुरक्षित राहा , असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे .